नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात सातारा जिल्ह्याच्या
स्वयंसहायता गटाच्या दालनाचे उद्घाटन
· ग्रामीण उद्योजकांना राष्ट्रीय व्यासपीठ
नवी दिल्ली, दि. 26 : महाराष्ट्र सदन येथे सातारा जिल्ह्यातील स्वयंसहायता गटांच्या (SHG) उत्पादनांसाठी कायमस्वरूपी दालनाचे उद्घाटन निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात झाले. यावेळी अपर निवासी आयुक्त निवा जैन व सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार उपस्थित होत्या.
यंदा 15 ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी सातारा जिल्ह्यातील लखपती दीदी, बचत गटाच्या प्रमुख आणि आत्मनिर्भर क्लस्टर लेव्हल फेडरेशन (CLF) पुरस्कार विजेत्या दीदी यांच्यासह 20 महिलांनी सहभाग घेतला होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त श्रीमती विमला यांची भेट घेऊन आपली हस्तकला, खाद्यपदार्थ आणि स्थानिक उत्पादने भेट म्हणून सादर केली होती. या भेटीत सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशिनी नागराजन यांनी तयार केलेले निवेदन प्रतिनिधींमार्फत सुपूर्द केले होते, ज्यात बाजारपेठ आणि प्रदर्शनांमध्ये सहभागाची संधी तसेच आवश्यक समर्थनाची विनंती करण्यात आली होती. श्रीमती विमला यांनी या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत, या महिलांना त्यांची उत्पादने राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार या दालनाचे उद्घाटन करण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील स्वयंसहायता गटांनी शेती, अन्नपदार्थ आणि हस्तकला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. इंद्रायणी तांदूळ, सेलम-हळद, सेंद्रिय ज्वारी, बाजरी, स्ट्रॉबेरी, जॉगरी, शेंगदाणा तेल, घोंगडी, रेशीम वस्त्रे, साबण, मसाले आणि बाजरीचे कुकीज यांसारख्या उत्पादनांनी स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेत विशेष ओळख निर्माण केली आहे. विशेषतः साताऱ्याच्या घोंगडी आणि रेशीम वस्त्रांनी त्यांच्या टिकाऊपणा आणि सांस्कृतिक मूल्यांमुळे दिल्लीच्या ग्राहकांमध्ये लोकप्रियता मिळवली आहे.
दालनात सातारा जिल्ह्याची खास उत्पादने, भौगोलिक मानांकन (GI) प्राप्त वस्तू, शेती उत्पादने, हस्तकला आणि गृहउपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री होणार आहे. भविष्यात फिरते दालन आणि बहुमजली मॉल यांसारख्या सुविधा उपलब्ध करून ग्रामीण उद्योजकता आणि महिला सक्षमीकरणाला आणखी चालना देण्याचे नियोजन आहे. हे दालन महाराष्ट्र सदनाला सातारा जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि आर्थिक केंद्राचे स्वरूप देईल, तसेच ग्रामीण उद्योजकांचा आत्मविश्वास वाढवून त्यांच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा मिळेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
0000
No comments:
Post a Comment