इमारतींचा स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून
क्लस्टर आधारित विकास करण्यासाठी म्हाडामार्फत प्रयत्न
-गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
मुंबई, दि. १० : म्हाडामार्फत उभारल्या जाणाऱ्या इमारतींमध्ये रहिवाशांना वीज, पाणी, रस्ते अशा विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून इमारतींचा विकास करताना क्लस्टर आधारित विकास व्हावा, असा म्हाडाचा प्रयत्न असून या माध्यमातून रहिवाशांना अधिक सुविधा देता येतील, असे गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य ॲड. निरंजन डावखरे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, प्रवीण दरेकर, सचिन अहिर, भाई जगताप आदींनी सहभाग घेतला.
राज्यमंत्री डॉ.भोयर म्हणाले, म्हाडामार्फत क्लस्टर आधारित विकास करताना काही सदनिका बाजारभावाने विकून निधी उभारला जातो. या माध्यमातून अतिरिक्त सुविधा दिल्या जातात. जुन्या रहिवाशांना देखील या सुविधांचा लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन चर्चा करण्यात येईल. म्हाडाच्या प्रकल्पांमध्ये पायाभूत सुविधांबरोबरच वाहनतळाची सुविधा दिली जात आहे. त्याचबरोबर काही प्रकल्पांमध्ये व्यायामशाळा, बाजारपेठ आदी सुविधाही दिल्या जात आहेत. यामध्ये यापुढे हरित क्षेत्राचा समावेश करण्याबाबत देखील विचार करण्यात येईल, असेही त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले. इमारतींचा विकास करताना विकासकास रेरा कायदा अनिवार्य असून याचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास त्याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment