एमआयडीसी’ मधील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी
भविष्यात बहुमजली पार्किंगचा विचार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १६ : राज्यातील सर्व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रांमध्ये (एमआयडीसी) पार्किंगची समस्या दिसून येत असून यासाठी सध्या एमआयडीसीकडील मोकळ्या जागेचा वापर केला जाईल. भविष्यातील तरतूद म्हणून बहुमजली पार्किंग सुविधा निर्माण करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य विक्रांत पाटील यांनी तळोजा ‘एमआयडीसी’मध्ये पार्किंगची समस्येबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगताप यांनी सहभाग घेतला.
तळोजा ‘एमआयडीसी’बाबत गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, तळोजा ही मोठी एमआयडीसी आहे. येथे येणाऱ्या वाहनांची संख्या देखील मोठी आहे. सध्या येथे १४० पार्किंगची सुविधा उपलब्ध असून अधिकच्या पार्किंगसाठी ‘एमआयडीसी’ने जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. येथील एका कंपनीच्या वॉशिंग सेंटरसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना पार्किंग सुविधेबाबत कळविण्यात येईल, असे त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
00000
बी.सी.झंवर/विसंअ/
वृत्त क्र. ३३४
विधानसभा लक्षवेधी सूचना :
परिवहन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी उपाय योजना करणार
- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, दि. १६ :- राज्य शासनाने प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. मुंबईत प्रवाशांची होणारी गर्दी पाहता प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी राज्य शासनाने जलवाहतूक, पॉट टॅक्सी (हवेतून चालणाऱ्या टॅक्सी) आणि रोप वे यासारख्या पर्यायी वाहतूक व्यवस्थांचा विचार सुरू केला आहे. अशा परिवहन सेवांच्या माध्यमातून परिवहन सेवा अधिक सक्षम करण्यासाठी उपाय योजना करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
विधानसभा सदस्य अतुल भातखळकर यांनी मुंब्रा येथील रेल्वे अपघात संदर्भात आज विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य नाना पटोले यांनी सहभाग घेतला.
परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी सांगितले, रेल्वे केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असली, तरी राज्यातील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत राज्य शासन गंभीर आहे. मुंब्रा येथील रेल्वे अपघात ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू तर नऊ प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर जखमींना तातडीने सरकारी व खासगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
मंत्री श्री. सरनाईक यांनी सांगितले, मुंब्रा येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत उपायोजना करणे संदर्भात रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. मुंबईतील रेल्वे प्रवाशांची गर्दी कमी करणे, रेल्वे स्थानकामधील गर्दीचे व्यवस्थापन करणे, रेल्वे प्रवासादरम्यान होणारे प्रवाशांचे मृत्यू टाळणे व रेल्वे स्थानकांची सुरक्षा यासंदर्भात उपाय योजना करण्याचे निर्देश रेल्वे विभागास देण्यात आले आहेत.
मंत्री श्री. सरनाईक यांनी सांगितले, मुंबईसह राज्यातील वाढत्या रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी शासन विविध उपाय योजना राबवित असून या संदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली जाईल.
परिवहन सेवेवरील वाढता ताण कमी करण्यासाठी खाजगी आस्थापनांच्या कार्यालयीन वेळेबाबत टास्क फोर्स स्थापन करावा लागेल. या संदर्भातही उचित कार्यवाही केली जाईल. तसेच अॅप-आधारित परिवहन सेवांच्या गैरप्रकारांवरही सरकारने कारवाई सुरू केली आहे, असेही परिवहन मंत्री श्री. सरनाईक यांनी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment