महाराष्ट्राला २०४७ पर्यंत जागतिक दर्जाचे कौशल्य केंद्र बनवणार
- कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
'विकसित महाराष्ट्र २०४७' साठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाची कार्यशाळा
कार्यशाळेत ६० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचा सहभाग
मुंबई, दि. २२ : महाराष्ट्राला २०४७ पर्यंत जागतिक दर्जाचे कौशल्य केंद्र बनविण्यासाठी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग यासाठी सर्वांच्या सूचना लक्षात घेवून सर्वसमावेशक धोरण अमलात आणेल, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग मार्फत 'विकसित महाराष्ट्र २०४७' तज्ञ कार्यशाळा झाली. यावेळी विविध सामंजस्य करार देखील करण्यात आले. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, रतन टाटा कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर, कौशल्य विकास आयुक्त लहुराज माळी, ‘मित्रा’चे अतिरिक्त मुख्याधिकारी अमन मित्तल आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेसाई, वरिष्ठ अधिकारी, उद्योग क्षेत्रातील प्रमुख, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, बहुराष्ट्रीय संस्था आणि विकास भागीदार सहभागी झाले होते.
कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की,जागतिक पातळीवरचे उच्च दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले तर रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील. यासाठी कौशल्य विकास विभाग राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थाशी भागिदारी करत आहे.स्थानिक विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगार मिळण्यासाठी हे विचारमंथन खूप गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment