निर्मला सीतारामन यांची भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आणि त्यात जागतिक वित्तीय संस्थांकडून विविध प्रकल्पांसाठी केंद्रीय आर्थिक व्यवहार मंत्रालयाकडून परवानगी देण्याची मागणी केली. महाराष्ट्राने आपली अर्थव्यवस्था सर्व निकषांवर उत्तम राखल्याबद्दल निर्मला सीतारामन यांनी यावेळी प्रशंसा केली.
या प्रकल्पांमध्ये 1000 लोकसंख्या असलेल्या गावांना काँक्रिट रस्त्यांनी जोडण्यासाठीचा प्रकल्प आहे. यासाठी आशियाई डेव्हलपमेंट बँकेकडून 1 अब्ज डॉलर्स (सुमारे 8651 कोटी रुपये) इतके आर्थिक सहाय्य मागण्यात आले आहे. दुसरा प्रकल्प महाराष्ट्रातील समुद्रकिनार्याची पातळी वाढत असल्याने त्याचे नैसर्गिक उपायांनी निराकरण करणे हा आहे. यासाठी 500 मिलियन डॉलर्स (सुमारे 4326 कोटी रुपये) इतकी मदत मागण्यात आली आहे. तिसरा प्रकल्प महापालिका शहरांमधून सांडपाण्यावर प्रक्रिया करुन उद्योगांसाठी पुनर्वापर हा आहे. यासाठी 500 मिलियन डॉलर्सचे (सुमारे 4326 कोटी रुपये) अर्थसहाय्य मागण्यात आले आहे. उर्वरित दोन प्रकल्पांसाठी जागतिक बँकेकडून मदत मागण्यात आली आहे. या तिन्ही प्रकल्पांसाठी वित्तमंत्रालयाने मंजुरी द्यावी, यासाठीचे निर्देश निर्मला सीतारामन यांनी या बैठकीत दिले. या बैठकीला वित्त विभाग सचिव अनुराधा ठाकूर, मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment