पवई व तुळशी तलावातील गाळ काढण्यासंदर्भात
तीन महिन्यात कृती आराखडा सादर करा
- मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार
मुंबई, दि. २५ : पवई तलाव व तुळशी आणि विहार तलावातील गाळ काढण्यासंदर्भात येत्या तीन महिन्यात कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.
पवई तलावातील गाळ काढण्यासंदर्भात मंत्रालयात श्री. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनसंरक्षक अनिता पाटील यांच्यासह पर्यावरण विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दरवर्षी जुलैमध्ये पवई तलाव भरून वाहत असतो. मात्र, यंदा जून महिन्यातच पवई तलाव भरून वाहू लागला आहे. त्यामुळे गाळ न काढल्यामुळे हा तलाव लवकर भरला का, तसेच तलावातील गाळ काढण्यासंदर्भात करावयाच्या उपाययोजनासंदर्भात यावेळी चर्चा झाली. पवई तलावातील प्रदुषणासंदर्भात ‘मेरी’ संस्थेने सर्वेक्षण केले आहे, असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पवई तलावचा परिसर हा ५५७ एकरावर आहे. जलपर्णी वाढल्याने तलाव परिसरातील सांडपाणी रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. पवई व तुळशीविहार तलावातील गाळ काढल्यानंतर त्याची वाहतूक व साठवणुकीसंदर्भात अभ्यास अहवाल तयार करून कृती आराखडा तयार करावा. गाळ काढण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मदत घेण्यात यावी, अशा सूचना श्री. शेलार यांनी यावेळी दिल्या.
०००००
No comments:
Post a Comment