गडचिरोलीला राज्यातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा बनविणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· गडचिरोलीची 'स्टील हब'च्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल
· नैसर्गिक संपत्तीचा विनाश न करता विकास साधण्यास प्राधान्यक्रम
· गडचिरोलीत लॉयड्स मेटल्सच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन
गडचिरोली, दि. 22 (जिमाका) : गडचिरोलीची ‘स्टील हब’च्या दिशेने वाटचाल होत असून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात लोह उद्योग प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. त्यातून त्यांच्या जीवनमानात बदल घडून गडचिरोलीत परिवर्तन घडत आहे. जल, जंगल, जमीन या गडचिरोलीच्या नैसर्गिक संपत्तीचा विनाश न करता विकास साधण्यास प्राधान्यक्रम असणार आहे. पुढील काही वर्षात नागरिकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होऊन गडचिरोली राज्यातील पहिल्या क्रमांकाचा जिल्हा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्यातील कोनसरी येथे लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेडच्या (एलएमईएल) विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. यात हेडरी येथील ५ दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेच्या आयर्न ओर ग्राइंडिंग प्लांट, हेडरी ते कोनसरी दरम्यानची ८५ किलोमीटर लांबीची आणि १० दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेची स्लरी पाइपलाइन, आणि कोनसरी येथील ४ दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेच्या पेलेट प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. याव्यतिरिक्त, कोनसरी येथे ४.५ दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेचा एकात्मिक स्टील प्रकल्प, १०० खाटांचे रुग्णालय, सीबीएसई शाळा आणि सोमनपल्ली येथील लॉयड्सच्या कर्मचारी वसाहत या प्रकल्पांचे भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. गडचिरोलीला 'स्टील हब ऑफ इंडिया' बनविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तसेच गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, पद्मश्री पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्त्या तुलसी मुंडा, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, पोलिस जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. निलोत्पल, लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत बोकारे, कोनसरीचे सरपंच श्रीकांत पावडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment