वृत्त क्र. ७३
विधान परिषद प्रश्नोत्तर :
विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी विविध उपाययोजना
- शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
मुंबई, दि. ४ : इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत भविष्यातील करिअर संधी संदर्भातील विविध स्पर्धा परीक्षा, तसेच परीक्षेदरम्यान येणाऱ्या ताण - तणावाचे व्यवस्थापन इ. विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात येतात. तसेच शिक्षक समुपदेशकांद्वारे समुपदेशनही केले जाते. याचबरोबर विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात शाळांसाठी सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य श्रीमती चित्रा वाघ यांनी १० ते १८ वयोगटातील मुलामुलींच्या आत्महत्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
याबाबत अधिक माहिती देताना राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर तसेच परीक्षेतील ताण-तणाव बाबत समुपदेशन करण्यासाठी राज्यातील विविध शाळांत काम करणाऱ्या ३५७ शिक्षक समुपदेशकांची यादी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विभागामार्फत सक्षम बालक योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी तसेच त्यांचे समुपदेशन केले जाते. तथापि मुलामुलींच्या आत्महत्यांसंदर्भातील सूचनांची निश्चित दखल घेतली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रातील ३६ पैकी ३४ जिल्ह्यांमध्ये स्टार्स प्रकल्पांतर्गत राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मानसिक आरोग्य जागरूकता शिबिर कार्यक्रम सन २०२३-२४ मध्ये राबविण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून इयत्ता सातवी, आठवी व नववीच्या वर्गाला शिकविणाऱ्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील किमान १०० शिक्षकांना जिल्हा स्तरावर प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षण सत्रादरम्यान शिक्षकांना सायबर सुरक्षा, सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श आणि हेल्पलाइन नंबरबद्दल प्रशिक्षित करण्यासंदर्भात शिक्षित करण्यात आले असल्याची माहिती राज्यमंत्री डॉ.भोयर यांनी दिली.
00000
No comments:
Post a Comment