आ. आव्हाड - आ. पडळकर राडा रोखल्याबद्दल मार्शल सुरक्षा रक्षकांना सभापती राम शिंदेंकडून शाबासकी..!
मुंबई. (प्रतिनिधी) – विधानभवनाच्या प्रांगणात झालेल्या आक्रमक व तणावपूर्ण घटनेत आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार वादावादी व धक्काबुक्की झाल्याने क्षणभर वातावरण तापले होते. यावेळी उपस्थित सुरक्षा रक्षकांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोन्ही गटांना वेळीच बाजूला करत परिस्थिती आटोक्यात आणली. त्यांच्या धाडसी आणि दक्षतेमुळे मोठा अनुचित प्रकार टळला.
या घटनेदरम्यान सुरक्षा विभागातील मार्शल उमेश पवार, मुबारक पठाण, सचिन पाटणे आणि गोडसे यांनी अत्यंत तत्परता आणि शिस्त दाखवून दोन्ही गटांना वेगळे केले. घटनेचा पुढील अनर्थ टाळण्यात त्यांचा निर्णायक वाटा होता. सदर रक्षकांनी ना केवळ गोंधळ नियंत्रणात आणला, तर संपूर्ण परिसराची सुरक्षा आणि शांती कायम राखली. तसेच, विधिमंडळाच्या सन्मानाचाही जप केला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी विशेष कौतुक करत सुरक्षा रक्षकांना वैयक्तिकरित्या शाबासकी दिली. त्यांनी सांगितले की, "विधानभवन हे महाराष्ट्राच्या लोकशाही व्यवस्थेचे मंदिर आहे. येथे कोणत्याही प्रकारची असंविधानिक किंवा असभ्य वर्तनाची परवानगी दिली जाणार नाही.
सभापतींच्या या प्रशंसेमुळे सुरक्षारक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, विधिमंडळाच्या कार्यवाहीदरम्यान शिस्त आणि सुरक्षिततेचे भान राखणारे हे मुंबई पोलीसचे कर्मचारी खऱ्या अर्थाने "शिलेदार" ठरत आहेत. विधानभवन परिसरात सुरक्षा कडक करण्याची मागणीही या निमित्ताने पुढे येत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा विधानभवनातील सुरक्षा व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. सुरक्षा विभागातील कर्मचारी केवळ शरीराने नव्हे, तर मनाने आणि विवेकबुद्धीने कार्य करत असून, त्यांनी राजकीय व सामाजिक समन्वय राखण्यासाठी केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे.
No comments:
Post a Comment