संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- संत नामदेव महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार
- मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संत शिरोमणी नामदेव महाराज, परिवार व संत जनाबाई महाराज यांचा 675 वा संजीवन समाधी सोहळा
सोलापूर/पंढरपूर दि. 23 : समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या आणि भागवत धर्माचा विचार आपल्या लेखणी व वाणीने देशभर पोहोचविणाऱ्या संत नामदेव महाराज यांच्या पंढरपूर येथील मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येईल. संत नामदेव महाराजांच्या समाधीस्थळी वैश्विक दर्जाचे स्मारक उभारतांना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. त्यांचे विचार हे त्यांचे खरे स्मारक असून हे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पंढरपूर येथे आयोजित श्री संत शिरोमणी नामदेव महाराज, परिवार व संत जनाबाई यांच्या षष्ठ शतकोत्तर संजीवन समाधी सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, श्री नामदेव क्षत्रिय एकसंघाचे अध्यक्ष महेश ढवळे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गुरु गोविंदसिंग, संत कबीर यांनी संत नामदेवांचा उल्लेख अत्यंत आदराने केला आहे. मीराबाई, नरसी मेहता यांच्या काव्यातदेखील नामदेव महाराजांचे विचार पहायला मिळतात. भारताच्या सर्व दिशांना जोडण्याचे आणि खऱ्या अर्थाने भागवत धर्मातील विचार वैश्विक करण्याचे कार्य त्यांनी केले. सामाजिक समरसतेचे वस्त्र विणण्याचे, संपूर्ण व्यवस्था बदलण्याचे आणि समाजाला एकतेचे मूल्य देण्याचे कार्य नामदेव महाराजांनी केले. संत कबीर, दादू, गरीबदास यांनी विचारांची प्रेरणा संत नामदेवांकडून घेतली. आपल्या संतभूमीत अभंगांच्या माध्यमातून संतांचा हा विचार आपल्यापर्यंत पोहोचला आहे.
No comments:
Post a Comment