परळ स्थानकात जलद गाडीच्या थांब्यासाठी
रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करणार
- मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबईतील एफ दक्षिण विभागातल्या जनता दरबाराला जनतेचा उदंड प्रतिसाद
मुंबई दि. 16 : बहुराष्ट्रीय कंपन्या आणि विविध कार्पोरेट कार्यालयांमुळे परळ स्थानकात वर्दळ वाढली आहे. तसेच या भागात अनेक मोठी हॉस्पिटल्स असल्याने या स्थानकात जलद गाडीला थांबा मिळावा अशी जनतेची मागणी असून यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करू असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे. मुंबई महापालिकेतल्या एफ दक्षिण विभाग कार्यालयात आयोजित केलेल्या जनता दरबारात ते बोलत होते. या जनता दरबाराला जनतेचा उदंड प्रतिसाद लाभला.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा राबवून थेट जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत, अशी सूचना महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना केली होती. या सूचनेला अनुसरूनच या जनता दरबाराचे आयोजन केल्याचे लोढा यांनी स्पष्ट केले. जनता दरबाराच्या माध्यमाने जनतेचे प्रश्न सोडवून त्यांचे समाधान होई पर्यंत कार्यरत राहून लोकशाही अधिक बळकट करू, असेही त्यांनी म्हटले आहे. एफ विभाग कार्यालयातल्या जनता दरबारात प्रशासनाच्या विविध बारा विभागांसह रेल्वे प्रशासनाचे अधिकारीही उपस्थित होते. हे या जनता दरबाराचे वैशिष्ट्य ठरले. समस्या घेऊन आलेल्यांना एकाच छताखाली अधिकारीही उपलब्ध होत असल्याने आमचे हेलपाटे वाचले, असे उपस्थित नागरिकांनी सांगितले. अनधिकृत पार्किंग केलेली बेवारस वाहने, वाहतूक नियंत्रणाचे प्रश्न, पाण्याचा दाब, शिधा वाटपातील समस्या यासह गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकासाचे प्रश्न यावेळी नागरिकांनी मांडले. या जनता दरबारात तीनशेपेक्षा अधिक नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या असून त्यातील २०० हून अधिक नागरिकांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिथल्या तिथे समाधान केले. त्याचबरोबर उर्वरित नागरिकांच्या पाठपुराव्याकडे दुर्लक्ष न करता समस्यांचे निराकरण करावे असे आदेश मंत्री श्री. लोढा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
No comments:
Post a Comment