राज्यातील महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती
गुन्हेगारीवर लगाम; सुरक्षिततेपासून विकासापर्यंत महाराष्ट्राचे आश्वासक पाऊल
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्रातील विविध महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांना गती देण्यात येत असून मेट्रो, विमानतळ, रेल्वे, टनेल, सी-लिंक आणि कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पांना वेगाने चालना देण्यात येत आहे. राज्याच्या विकासासाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करून शहरी आणि ग्रामीण विकास अधिक गतिमान केला जात आहे. तसेच, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यात आली आहे. यामुळे सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीसारखे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. सुरक्षिततेपासून विकासापर्यंत महाराष्ट्राच्या विकासाची वाटचाल सुरू आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभेत म.वि.स.नियम २९२अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना बोलत होते.
*राज्यातील गुन्हेगारीत लक्षणीय घट, सायबर कॉर्पोरेशन स्थापन*
राज्यात २०२३ च्या तुलनेत यावर्षी तब्बल ११ हजार ६५९ गुन्ह्यांत घट झाली असून, गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये उघडकीस येण्याचे प्रमाण १६ टक्क्यांवरून १९ टक्क्यांवर पोचले आहे. आर्थिक फसवणुकीतील परत मिळणाऱ्या रकमेचे प्रमाण २०.७५ टक्क्यांवरून ६१ टक्क्यांवर आले आहे. ‘गोल्डन अवर’मध्ये माहिती मिळाल्यास ९० टक्के प्रकरणांत पैसे वाचवता येतात. सायबर सुरक्षेसाठी ‘सायबर कॉर्पोरेशन’ स्थापन करण्यात आले असून जिल्ह्यांत ५० सायबर प्रयोगशाळा सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच सायबर तक्रारींसाठी १९४५ व १९३० हे विशेष क्रमांक कार्यान्वित करण्यात आले आहेत. महिला अत्याचाराच्या घटनेतील ९१ टक्के प्रकरणे उघडकीस आणण्यात यश आले आहे, बलात्काराच्या घटनेत ९८ टक्के आरोपींची ओळख पटली आहे. तसेच बलात्कार प्रकरणांत ६० दिवसांत निर्णय होण्याचे प्रमाणही ९७.३ टक्क्यांपर्यत वाढले आहे.
No comments:
Post a Comment