विदर्भातील पूरस्थितीचा आढावा;
मदत आणि पुनर्वसन कार्य तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश
- मंत्री गिरीश महाजन
मुंबई, दि. १४ : विदर्भातील नागपूर व अमरावती विभागात ८ व ९ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठे नुकसानीचा आढावा घेत संबंधित प्रशासनाला मदत व पुनर्वसन कार्य तत्काळ व प्रभावीपणे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या नैसर्गिक आपत्तीत जिवीत व वित्तीय नुकसान मोठ्या प्रमाणावर झाल्याने राज्य शासनाने तातडीने उपाययोजना राबविल्या आहेत. बाधित नागरिकांना मदतीचा लाभ वेळेत व पारदर्शक पद्धतीने मिळावा यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क ठेवण्यात आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी निवेदनाद्वारे विधानसभेत दिली.
मंत्री श्री. महाजन म्हणाले, दिनांक ३० मे २०२५ च्या शासन निर्णयानुसार, घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदतनिधी जिल्हा स्तरावर वितरित करण्यात आला आहे. दिनांक २८ जुलै २०२३ च्या शासन निर्णयानुसार, घरगुती भांडी, कपडे, टपरीधारक व दुकानदार यांना दिली जाणारी मदत वितरित करण्यास मंजूर मुदतीस वाढ देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांना उणे (-) प्राधिकरणाचे अधिकार प्रदान करण्यात आले असून, आपत्तीमधील मदत वाटपाबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत.
नागपूर विभागातील पूरस्थिती आणि नुकसान:
नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली. ७ नागरिकांचा मृत्यू, ४ जखमी, १७ मोठी व १० लहान जनावरे मृत्युमुखी पडली. १,९२७ घरांचे अंशतः नुकसान तर ४० घरे पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत. २०९ गोठ्यांचे नुकसान झाले असून ७१५ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. २० हजार ८५४ हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले असून बाधित शेतकरी संख्या २९ हजार ९२० आहे. या ठिकाणी पंचनाम्याचे कार्य सुरू आहे.
अमरावती विभागात देखील अतिवृष्टीचा परिणाम दिसून आला. एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती जखमी झाला आहे. १८० घरांचे अंशतः नुकसान तर ९ घरे पूर्णतः पडली आहेत. ४ जनावरे दगावली असून ३ हजार ४११ हेक्टर शेती क्षेत्राचे नुकसान झाले आहे. संबंधित जिल्ह्यांमध्ये पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे.
No comments:
Post a Comment