वन्य प्राण्यांना मुबलक पाणी मिळण्यासाठी यासाठी
वनतळी, वन बंधाऱ्यांमधील गाळ काढणार
- वनमंत्री गणेश नाईक
मुंबई, दि. ११ :- वन्य प्राण्यांना वनातच मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वनतळी, वन बंधारे यासह पाणी साठवण तलावातील गाळ काढला जाईल, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य श्रीमती सुलभा खोडके यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी ही माहिती दिली. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य आदित्य ठाकरे, किशोर पाटील यांनी सहभाग घेतला.
वनमंत्री श्री. नाईक यांनी सांगितले की, मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वन्य प्राण्यांना त्यांच्या परिक्षेत्रात पाणी मिळावे यासाठी नैसर्गिक पाणवठे ५६१, कृत्रिम पाणवठे ४३२, सोलर पंप २९३, सिमेंट बंधारे २६९, दगडी बंधारे ८९५, मेळघाट बंधारे १२३६, ॲनीकिट बंधारे १५, माती बंधारे ६७ आणि वनतळी १२० अशी व्यवस्था करण्यात आहे.
वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी कुंपण घालण्यास यावर्षी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वन परिक्षेत्रातील उपक्रमांबाबत संबधित लोकप्रतिनिधींसमवेत बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीसाठी या क्षेत्रातील जागतिक स्तरावरील तज्ञांनाही आमंत्रित केले जाईल.
वनांच्या शेजारी असलेल्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीत पीक घेतले जात नाही अशा जमिनी वन विभाग वार्षिक ५० हजार रुपये भाड्याने घेईल. या जमिनीवर वन विभागामार्फत सुगंधी गवत लागवड केली जाईल. अधिकचे क्षेत्र भाड्याने मिळाल्यास या क्षेत्रावर सोलर वीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा मानस असल्याचेही श्री.नाईक यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment