परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी
‘एमआयडीसी’ची चार देशात केंद्र उभारणार
- उद्योगमंत्री उदय सामंत
· महाराष्ट्रात टेस्लाचे पहिले शोरूम
मुंबई, दि. १८ : देशातील टेस्लाचे पहिले शोरुम मुंबईमध्ये सुरू झाले आहे, महाराष्ट्र उद्योग स्नेही असल्याचीही पावती आहे. तसेच राज्यात मोठ्या प्रमाणावर आणखी परकीय गुंतवणूक आणण्याच्या दृष्टीने चार देशांमध्ये ‘एम आय डी सी’ ची केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. नियम २६० अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना मंत्री सामंत बोलत होते.
मुंबईतील बीकेसी येथे सुरू झालेले टेस्ला शोरूम महाराष्ट्रासाठी मोठा गौरव असल्याचे सांगून उद्योग मंत्री सामंत म्हणाले की, या उपक्रमामुळे जागतिक दर्जाच्या वाहन उत्पादन क्षेत्रात राज्याचे स्थान अधिक भक्कम होणार आहे. आगामी काळात टेस्लाची वाहने महाराष्ट्रातच बनविण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
हापूस आंब्याला मिळालेले ‘जीआय’ गोल्ड मेडल हे देखील राज्यासाठी गौरवास्पद ठरले आहे. रत्नागिरीच्या हापूस आंब्याला मिळालेल्या या मान्यतेमुळे राज्यातील शेती आणि फळउत्पादन क्षेत्राला जागतिक स्तरावर ओळख मिळाली असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.
उद्योग मंत्री सामंत म्हणाले की, रोजगार निर्मितीतही महाराष्ट्र आघाडीवर आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, विश्वकर्मा योजना आणि मधाचे गाव यांसारख्या उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील युवकांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
तसेच मनोरंजन क्षेत्रातही महाराष्ट्र पुढाकार घेत असून, मुंबईमध्ये वेव्हज समिट आयोजित करण्यात आले. राज्यातील मनोरंजन व्यवसायांना उद्योगाचा दर्जा देण्यासाठी उद्योग विभाग सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment