पुढील चार वर्षात देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करू
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सिकलसेल, थॅलेसिमिया, ॲनिमियावरील उपचारासाठी नवीन योजना तयार करणार
स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती
नागपूर, दि. 27 - प्राथमिक आरोग्य सुविधांच्या दृष्टीने प्रत्येक तीन किलोमीटरमध्ये आरोग्यसेवांचे जाळे निर्माण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येत्या चार वर्षांत देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे. येत्या काळात सिकलसेल, थॅलेसिमिया, ॲनिमियावरील महागड्या उपचारासाठी एक नवीन योजना तयार करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
लष्करीबाग येथील कमाल चौकात स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेद्वारा संचालित स्व. भानुताई गडकरी मोमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी अध्यक्षस्थानी तर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्ष कांचन ताई गडकरी यांची विशेष उपस्थिती होती.
आमदार संदीप जोशी, आमदार प्रवीण दटके, आमदार आशीष देशमुख, बेंगलुरू येथील महाबोधी सोसायटीचे महासचिव पुज्य भंते आनंद थेरा, नागपूर येथील रामकृष्ण मठाचे अध्यक्ष राघवेंद्र स्वामी, माजी मंत्री अॅड. सुलेखा कुंभारे, राजेश लोया, विशाखापट्टणम येथील एएमटीझेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जितेंद्र शर्मा,माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार गिरीश व्यास, माजी आमदार टेकचंद सावरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आरोग्याच्या क्षेत्रात सेवेसोबतच संवेदनेलाही तेवढेच महत्त्व आहे. नितीनजीकडे सेवा आणि संवेदना या दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळेच आईच्या नावाने डायग्नोस्टिक सेंटर सुरू करून गरिबांची सेवा करण्याचा विचार त्यांनी केला आणि तो प्रत्यक्षातही उतरवला. हे केंद्र आरोग्य सेवेच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, स्व. भानुताई गडकरी यांच्याकडून नितीनजींना समाजकार्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळेच ते देशात मोठ्या प्रमाणात काम करू शकत आहेत. समाजातील शेवटच्या व्यक्तीचे कल्याण हा नितीनजींच्या कार्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. उपेक्षितांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते सातत्याने काम करीत आहेत. उद्योग, कृषी, आरोग्य क्षेत्रात त्यांचे विशेष कार्य आहे. याच मालिकेत डायग्नोस्टिक सेंटरचा समावेश होतो. आरोग्यसेवेच्या क्षेत्रात हे खूप मोठे पाऊल असल्याचे ते म्हणाले.
एकीकडे वैद्यकीय क्षेत्रात विकसित तंत्रज्ञानाचा वापर वाढला असताना सेवांचे शुल्क देखील जास्त आहे. अशात एमआरआय आणि सिटी स्कॅनच्या मशीन्स भारतीय बनावटीच्या असतील तर सेवांचे शुल्क देखील कमी राहील. त्याचवेळी भविष्यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हॉस्पिटल्सची संख्या वाढवावी लागणार आहे. आरोग्य क्षेत्रात काम करीत असताना सेवाभाव आणि संवेदना ह्या गोष्टी आवश्यक असतात. पुढील चार वर्षात देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करण्यात येणार असून सिकलसेल, थॅलेसिमिया, ॲनिमियावरील उपचारासाठी नवीन योजना तयार करणार असल्याचे ते म्हणाले.
No comments:
Post a Comment