अंगणवाडी सेविका, मदतनीस भरती प्रक्रिया;
बालविकास प्रकल्प अधिकारी निलंबित
- महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे
मुंबई, दि. १० :- एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातील घनसागंवी प्रकल्प १ व २ मध्ये झालेल्या अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेत दोषी आढळून आलेल्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात येत असल्याचे महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
विधानसभा सदस्य हिकमत उढाण यांनी विधानसभेत याविषयीची लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर-साकोरे यांनी ही माहिती सांगितली.
महिला व बाल विकास राज्यमंत्री बोर्डीकर-साकोरे यांनी सांगितले, फेब्रुवारी २०२५ मध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. या भरती मधील याद्या एप्रिल-मे महिन्यात जाहीर करण्यात आल्या. जाहीर याद्यांवर काही नागरिकांनी तक्रारी दाखल केल्यानंतर या तक्रारींच्या अनुषंगाने सुनावणी घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जालना यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बाल विकास यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. या समितीने सखोल चौकशी करून आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार संबधित बालविकास प्रकल्प अधिकारी दोषी असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचे निलंबन करण्यात येत आहे. तसेच त्यांची विभागीय चौकशीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment