मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.० महत्वाकांक्षी योजना;
सप्टेंबर २०२५ पर्यंत ५००० मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. ३० : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही माझी महत्वाकांक्षी योजना आहे.सप्टेंबर २०२५ पर्यंत ५००० मेगावॅटचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी योजनेतील कामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई होता कामा नये.या योजनेचे राज्यातील सर्व कार्यान्वयिन यंत्रणांनी कामे गतीने व कालबध्द नियोजन करून करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० साठी जमीन उपलब्धता आणि इतर आनुषंगिक विषयांसंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव ऊर्जा आभा शुक्ला उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ही योजना माझी अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. खासगी आणि शासकीय जागेत विकसित होणा-या सौर प्रकल्पासाठी स्थानिक यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.जिल्हास्तरीय टास्क फोर्सने या योजनेच्या वेळोवेळी होणा-या कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घ्यावा.कामे करण्यासाठी ना- हरकत दाखले,विकासकांना येणा-या अडचणी प्राधान्याने सोडवाव्यात. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या योजनेतून सप्टेंबर २०२५ पर्यंत पाच हजार मेगावॅटपर्यंत वीज उपलब्ध होईल याप्रकारे जिल्हानिहाय कामांना गती देण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी दिले.
No comments:
Post a Comment