गोंदिया जिल्हा रुग्णालयातील अडचणींबाबत तात्काळ बैठक घेणार
- मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई, दि. १७ : गोंदिया जिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या रुग्णालयात ज्या सुविधा सध्या उपलब्ध नाहीत, त्या आरोग्यसुविधा तात्काळ उपलब्ध होणे व इतर अडचणींबाबत बैठक घेण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
याबाबत सदस्य राजकुमार बडोले यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, या रुग्णालयात सोनोग्राफी, डायलेसिस यंत्रणा व इतर वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. थॅलेसिमिया व सिकलसेल रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रक्तघटक पुरवठ्याबाबतही तातडीने उपाययोजना केली जात आहे. गंगाबाई रक्तपेढी ही गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असून, रक्तघटक वेगळे करणारे (सेपरेशन) यंत्र सध्या कार्यान्वित नाही. या मशीनसाठी आवश्यक असलेले लायसन्स सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन व राज्य शासनाच्या ‘एफडीए’ विभागाच्या संयुक्त तपासणीनंतर दिले जाते. ही तपासणी १ जुलै २०२५ रोजी होणार असून, त्यानंतर एका महिन्यात लायसन्स मिळेल.गोंदियामध्ये नव्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहे. यापुढे अधिष्ठाता यांच्याकडेच संपूर्ण कार्यभार असेल, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे तो दिला जाणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment