राज्यातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत संयुक्त बैठक घेणार
- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
मुंबई, दि. ११ : राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून यासंदर्भात लवकरच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत संयुक्त बैठक घेण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य विजयसिंह पंडित यांनी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दुर्दैवी अपघातात प्रवाशांचा मृत्यू प्रकरणी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना मंत्री श्री. भोसले बोलत होते.
मंत्री श्री. भोसले म्हणाले, रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रोड सेल्फी असिस्ट आधुनिक तंत्रज्ञानाधारित प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे रस्त्यावरील विविध धोकादायक ठिकाणांची प्रत्यक्ष छायाचित्रांसह नोंद घेतली जाते. तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समिती गठीत करण्यात आली असून यामध्ये तांत्रिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातील रस्ते अपघात आणि आवश्यक उपाययोजना संदर्भात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना राबवण्यात येतील. तसेच महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणांवर तांत्रिक सुधारणा, संकेतचिन्हे, गती नियंत्रण यंत्रणा, वळणांवरील संरक्षक उपाययोजना सारख्या आवश्यक पायाभूत सुधारणा करण्यात येतील, असेही मंत्री श्री. भोसले यांनी यावेळी सांगितले.
या चर्चेत सदस्य सुरेश धस, बाबासाहेब देशमुख, अमोल जावळे, मनोज कायंदे, हिकमत उढाण आणि शेखर निकम यांनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment