मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील
धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी बैठक घेणार
- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई दि. ९ :- मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना उपयुक्त आहे. या महापालिका क्षेत्रातील आशा इमारतीच्या पुनर्विकास संदर्भात उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
सदस्य नरेंद्र मेहता यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडली. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य राजन नाईक यांनीही सहभाग घेतला.
मिरा भाईंदरमध्ये २४ क्लस्टर तयार करण्यात आले असून, त्यापैकी सात क्लस्टरची कार्यवाही सुरू असल्याचे सांगून राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, मिरा भाईंदर ग्रामपंचायतची नगरपालिका आणि नंतर महानगरपालिका झाली आहे. महापालिकेने घोषित केलेल्या युआरपी (URP) मधील बहुतांशी इमारती या ग्रामपंचायत कालावधीतील अनधिकृत इमारती तर काही इमारती या अधिकृत आहेत. मिरा भाईंदर महानगरपालिकेने यावर्षी महापालिका क्षेत्रात ४२ अतिधोकादायक इमारती घोषित केल्या आहेत. या इमारतींपैकी १६ इमारती या क्लस्टर मध्ये अंतर्भूत असल्याचेही राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी सांगितले.
मिरा भाईंदर मधील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकास संदर्भात आयोजित केल्या जाणाऱ्या बैठकीसाठी तेथील लोकप्रतिनिधीना आमंत्रित केले जाईल, असेही राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment