छत्रपती संभाजीनगरच्या वैद्यकीय रुग्णालयासाठी
३४.२८ कोटींचा निधी; औषधांचा तुटवडा नाही
· मंत्री माणिकराव कोकाटे यांची विधानपरिषदेत माहिती
मुंबई, दि. १६ :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे औषधे व शस्त्रक्रिया साहित्य खरेदीसाठी वित्तीय वर्ष 2024-25 मध्ये एकूण ३४.२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून या रुग्णालयात सध्या औषधांचा कोणताही तुटवडा नाही, अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाबाबत विधानपरिषदेत नियम क्रमांक 260 अन्वये सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर मंत्री कोकाटे बोलत होते.
मंत्री कोकाटे म्हणाले, यामध्ये राज्य अनुदानातून १८.२९ कोटी व जिल्हा नियोजन निधीतून १५.९९ कोटी रुपयांचा समावेश आहे. तसेच वित्तीय वर्ष 2025-26 साठी देखील १० कोटी रुपये व २.५५ कोटी रुपयांची पुरवणी मागणी प्रस्तावित आहे.
तसेच महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळामार्फत वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सुरक्षा अधिकारी व रक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment