त्रिभाषा सूत्रासंदर्भात सांगोपांग अभ्यास करुन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी
डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· तृतीय भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द
· पावसाळी अधिवेशनात 12 विधेयके
· अधिवेशनात सविस्तर चर्चा करुन जनतेचे प्रश्न सोडविणार
· लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यासाठी 3600 कोटी मंजूर
मुंबई, दि. 29 - राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये पहिलीपासून मराठी भाषा सक्तीची आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे त्रिभाषा सूत्राबाबत सांगोपांग अभ्यास करुन तसेच भविष्यात महत्वाच्या ठरणाऱ्या अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिटचे महत्त्व विचारात घेऊन विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या समितीचा अहवाल येईपर्यंत तृतीय भाषा संदर्भातील काढण्यात आलेले राज्य सरकारचे 16 एप्रिल 2025 आणि 17 जून 2025 रोजीचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास उद्या दिनांक 30 जून पासून मुंबई येथे सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्याला विकासाकडे नेण्याच्या दिशेने राज्य सरकार काम करीत आहे. या अधिवेशनामध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी सविस्तर चर्चा करण्याच्या उद्देशाने शासनाने तीन आठवड्यांचे अधिवेशन प्रस्तावित केले आहे. या अधिवेशनात एकूण 12 विधेयके सादर होणार असून प्रलंबित असलेले एक विधेयक आणि संयुक्त समितीकडील एक विधेयकावर देखील चर्चा होईल. त्याचबरोबर सहा अध्यादेश पटलावर ठेवले जातील. राज्यात जून महिन्यातील पावसाची स्थिती समाधानकारक असून पेरण्या देखील चांगल्या झाल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांसाठी मुबलक प्रमाणात बियाणे आणि खतांच्या उपलब्धतेसाठी यंत्रणा काम करीत असून काही ठिकाणी असलेल्या तक्रारी दूर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment