महाराष्ट्राच्या प्रगतीचा बहुआयामी आराखडा तयार;
२०३० पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, ४ : महाराष्ट्र २०३० पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठणार आहे आणि या दिशेने राज्याने ठोस पावले उचलली आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
हॉटेल ताज लँड्स एन्ड येथे मॉर्गन स्टॅन्ले आयोजित "इंडिया इन्वेस्टमेंट फोरम 2025" मध्ये मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, सामाजिक आणि पर्यावरणीय प्रगतीच्या विविध पैलूंवर सविस्तर माहिती दिली.
सध्या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अर्ध्या ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेली आहे. टाटा सन्स यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक सल्लागार परिषद स्थापन झाली असून, २० वरिष्ठ सीईओंच्या सहकार्याने एक विस्तृत रोडमॅप तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात पायाभूत सुविधा, उद्योग, सेवा, शेती व फिनटेक या क्षेत्रांचा समावेश आहे. याचबरोबर ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ आराखड्याचे सादरीकरण २ ऑक्टोबर रोजी होणार असून त्यात अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन टप्प्यांचे उद्दिष्टे निश्चित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
औद्योगिक विस्तार
मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील औद्योगिक ताकद आता केवळ मुंबई-पुण्यापुरती मर्यादित न राहता छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, नाशिक, रायगड यांसारख्या भागांत झपाट्याने वाढते आहे. इव्ही हब, स्टील सिटी, व औद्योगिक टाऊनशिपद्वारे संपूर्ण राज्य औद्योगिक महासत्ता बनत आहे.
१०० मिलियन डॉलर्सची पायाभूत गुंतवणूक
मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी १०० मिलियन डॉलर्सची पायाभूत गुंतवणुक करण्यात येणार असल्याचे सांगून त्यात वाढवण बंदर, नागपूर-गोवा महामार्ग, नवीन विमानतळ, मुंबई मेट्रो आणि कोस्टल रोड प्रकल्पांचा समावेश आहे. हे सर्व प्रकल्प राज्याच्या व्यापार व वाहतूक व्यवस्थेला नवे परिमाण देणार आहेत असेही सांगितले.
No comments:
Post a Comment