Friday, 20 June 2025

विधानभवनमध्ये २३, २४ जून रोजी संसद आणि राज्यांच्या अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद

 विधानभवनमध्ये २३, २४ जून रोजी

संसद आणि राज्यांच्या अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद

 

          मुंबई, दि. २० : भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानभवन येथे २३ व २४ जून२०२५ रोजी या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

          परिषदेला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णनविधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेविधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारविधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेविधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेविधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते  अंबादास दानवेलोकसभेच्या अंदाज समितीचे समिती प्रमुख डॉ. संजय जयस्वालमहाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचे समिती प्रमुख अर्जुन खोतकर उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या समारोपानंतर दिनांक २४ जून२०२५ रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची पत्रकार परिषद होईल.

          या राष्ट्रीय परिषदेमध्ये "प्रशासनीक कार्ये सक्षमपणे आणि अल्पव्ययासह होतील याची सुनिश्चिती करण्यासाठी अर्थसंकल्पीय अंदाजांचे पुनर्विलोकन आणि प्रभावी नियंत्रण यासाठी अंदाज समितीची भूमिका" या विषयावर विचारमंथन होईल.

या दोन दिवसीय परिषदेमध्ये संसद, सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या अंदाज समित्यांचे समिती प्रमुख आणि सदस्य सहभागी होणार आहेत. महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सर्व सदस्य आणि महाराष्ट्रातील संसद सदस्य देखील या परिषदेस उपस्थित राहणार आहेत.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi