Thursday, 5 June 2025

स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार व ग्रामपंचायतींना मोफत पाणीपुरवठा देण्याची आग्रही भूमिका

 बोईसर - तारापूर एमआयडीसीतील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करा – आमदार विलास तरे


# स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार व ग्रामपंचायतींना मोफत पाणीपुरवठा देण्याची आग्रही भूमिका


बोईसर / मुंबई. (प्रतिनिधी) –
 बोईसर - तारापूर एमआयडीसीत केमिकल, अभियांत्रिकी, औषधनिर्मिती आणि वस्त्रोद्योग अशा प्रमुख उद्योग प्रकारांतून मोठ्या प्रमाणावर सांडपाणी आणि घनकचरा निर्माण होत आहे. या सांडपाण्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करावे, स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी द्याव्यात, तसेच एमआयडीसी लगतच्या ग्रामपंचायतींना मोफत पाणीपुरवठा करावा, अशी ठाम मागणी आमदार विलास तरे यांनी उद्योग भवन येथे झालेल्या बैठकीत केली.

यावेळी आमदार तरे म्हणाले, “बोईसर - तारापूर औद्योगिक वसाहतीत लघु, मध्यम व मोठ्या अशा एकूण सुमारे 1216 कारखाने कार्यरत आहेत. त्यामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांबाबत गंभीरपणे विचार करून पावले उचलण्याची गरज आहे.” 'आनंद सोमन विरुद्ध महाराष्ट्र शासन' (ओ.ए. 58/2024) या प्रकरणात राष्ट्रीय हरित लवादाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने केलेल्या अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, पास्थळ गावातील बोरवेलमधील पाणी अत्यंत दूषित असून, ते पिण्यास तसेच घरगुती वापरास अयोग्य आहे. सप्टेंबर 2024 मध्ये सादर झालेल्या या अहवालात गावकऱ्यांना मोफत व सुरक्षित पाणीपुरवठा करावा, अशी शिफारस करण्यात आली होती, ज्यास हरित लवादाने दि. 14 नोव्हेंबर 2024 रोजीच्या आदेशाद्वारे मान्यता दिली आहे. आमदार तरे यांनी याच मुद्द्यावर भर देत, “पास्थळ प्रमाणेच एमआयडीसी लगतच्या इतर ग्रामपंचायतींनाही मोफत पाणीपुरवठा करण्यात यावा,” अशी जोरदार मागणी केली.

या महत्वपूर्ण बैठकीस आमदार विलास तरे यांच्यासह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय सावळकर, प्रादेशिक अधिकारी (ठाणे-1) उदय किसवे, उपअभियंता अविनाश संखे, म.प्र.नि.म. प्रादेशिक अधिकारी किरण हसबनीस, पालघर औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे नरेश देवराज तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान बैठक संपल्यानंतर आमदार विलास तरे यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाप्रसे पी. वेलरासू, सह मुख्य कार्यकारी अधिकारी (‍प्रशासन) भाप्रसे डॉ. कुणाल खेमनार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन झालेल्या बैठकीचे प्रमुख मुद्द्यांवर चर्चा केली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi