माणुसकी धर्मानुसार पोलीसांचे काम
पोलीस आयुक्तालयाने दोन चांगल्या प्रणाली सुरू केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांना उतारवयात आधाराची गरज असते, कोणीतरी पाठीशी उभे आहे असे त्यांना वाटायला हवे. अनेकदा ज्येष्ठांना आपत्कालीन परिस्थितीत मदतीची आवश्यकता असते. माणुसकी हा धर्म मानून पोलीस काम करतात. त्यादृष्टीने पोलीस आयुक्तालयाने तयार केलेले ‘ज्येष्ठानुबंध’ हे ॲप ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त ठरेल. पुणे, पिंपरी चिंचवड आदी ठिकाणी वाहतुकीच्या नियमनासाठी 'इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम' सुरू करण्यात येत असून त्यात एआयचा समावेश असलेल्या प्रणाली आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पोलीस दल सज्ज होत असून नागरिकांसाठी चांगली यंत्रणा उभी रहात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आमदार महेश लांडगे म्हणाले, राज्य शासनाने सहकार्य केल्याने पिंपरी चिंचवड परिसरात पोलीस आयुक्तालयाची आणि महानगरपालिकेची विकासकामे वेगाने होत आहेत. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी या परिसराच्या विकासाला विशेष गती दिल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस आयुक्त श्री. चौबे म्हणाले, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने ज्येष्ठ नागरिकांसाठी 'ज्येष्ठानुबंध' हे ॲप विकसित केले आहे. या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना पोलिसांशी संपर्क साधता येईल. २२ हजार नागरिकांनी आतापर्यंत हे ॲप डाउनलोड केले असून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोगामुळे ज्येष्ठ नागरिकांना हे ॲप उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 'ट्रॅफिक बडी' व्हाट्सअप प्रणालीच्या माध्यमातून वाहतूक नियमनात नागरिकांचे सहकार्य होईल. आतापर्यंत ३०० नागरिकांनी 'ट्रॅफिक बडी' म्हणून नोंदणी केली आहे. पोलिसांविषयी आदर आणि विश्वास निर्माण करणाऱ्या या दोन प्रणाली असल्याचे त्यांनी सांगितले.
महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी प्रास्ताविकात माहिती दिली, पिंपळे सौदागर येथे गिर्यारोहणासाठी क्लायबिंग वॉल उभारण्यात आली असून हा प्रकल्प देशातील उत्तम केंद्रापैकी एक असेल. विविध विकास प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने विविध प्रकल्पांचे लोकार्पण, उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले. तसेच या प्रकल्पांविषयी चित्रफीत दाखविण्यात आली.
No comments:
Post a Comment