भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी प्रयत्न करूया
पुणे, दि. २१: योग ही आमची परंपरा, संस्कृती, आनंददायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. ही चिकित्सा पद्धती आहे. भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी, स्वस्थ समाजाची निर्मिती व्हावी, असा प्रयत्न सर्व मिळून करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी आणि श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'वारकरी भक्तीयोग' कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, संत साहित्याचे अभ्यासक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, विठ्ठल रुख्मिणी संस्थान पंढरपूरचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम, क्रीडा संचालक शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे सदस्य राजेश पांडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस योग हा शरीर आणि मनाला सर्वार्थाने पुनरुज्जीवित करणारा असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, योगाचे हे आमचे प्राचीन ज्ञान जगाने स्वीकारावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रात योग दिनाचा प्रस्ताव ठेवला आणि सर्व देशांनी पाठिंबा दिलेला हा संयुक्त राष्ट्राच्या इतिहासात एकमात्र प्रस्ताव आहे. गेले ११ वर्ष जागतिक योग दिवस साजरा करण्यात येत आहे.
योगसाधना कोणालाही करता येते. शरीर, मनाला आणि शरीरातील सर्व चक्रांना पुनुरुज्जीवित करत उभारी देण्याचे काम योगासनाच्या माध्यमातून होते. ही सर्व आसने शरीराची रचना लक्षात घेऊन रचलेली आहेत. नखापासून केसापर्यंत शरीराच्या प्रत्येक बाह्य आणि अंतर्गत अवयवाला दिशा देण्याची आणि उपचार करण्याची रचना योगासनात आहे. जगामध्ये योगासनाकडे उपचार शक्ती (हिलींग पॉवर), आरोग्यदायी जीवनशैली (वेलनेस) म्हणून पाहिले जाते, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment