मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध २१ कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
- अकोला जिल्ह्यातील विकासाचा प्रवाह गतिमान
- २ हजार ५८८ कोटी ५५ लाख रू. निधीतून विकासकामे
अकोला दि. ११ : अकोला जिल्ह्यात सुमारे अडीच हजार कोटींहून अधिक म्हणजेच २ हजार ५८८ कोटी ५५ लाख रूपयांच्या निधीच्या विविध २१ विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले. सिंचन, रस्ते, रूग्णालय सुधारणा, सांस्कृतिक भवन, तरण तलावासह विविध प्रशासकीय इमारती अशा विकास कामांमुळे जिल्ह्यातील विकासाचा प्रवाह गतिमान होणार आहे.
विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार सर्वश्री रवींद्र चव्हाण, हरिष पिंपळे, प्रकाश भारसाकळे, वसंत खंडेलवाल, किरण सरनाईक, श्याम खोडे, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, पोलीस महानिरीक्षक रामराव पोकळे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, पोलिस अधिक्षक अर्जित चांडक आदि मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन, अद्ययावत व सुसज्ज इमारतीचे लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वागत कक्ष, हिरकणी कक्ष, आनंदी कक्ष, आवश्यक दस्तऐवज मिळण्यासाठी किऑस्क सुविधा आदींचे निरीक्षण केले. त्यानंतर नियोजन भवनात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकाचवेळी ऑनलाईन पद्धतीने विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
अकोला येथील तहसील, तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या अद्ययावत इमारतीचे तसेच महिला व बालविकास भवनाचे लोकार्पण झाले. पूर्णा नदीवरील काटीपाटी बॅरेज प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. सुमारे ४५४.६२ कोटी रूपयांच्या निधीतून सिंचनाची व्यवस्था निर्माण होऊन शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
No comments:
Post a Comment