संविधानातील मौलिक विचार जनतेपर्यंत पोहचतील
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने संविधान उद्देशिका पार्क उभारण्यासाठी पुढाकार घेतला व राज्य शासनाच्या अर्थ सहाय्याने आणि लोकसहभागातून ही उत्तम संकल्पना प्रत्यक्षात आली. या पार्कच्या माध्यमातून संविधानातील मौलिक विचार या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह समस्त जनतेपर्यंत पोहचतील याचा महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी म्हणून सार्थ अभिमान व समाधान असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
नागपूर विद्यापीठाने देशाला पंतप्रधानांसारख्या महान व्यक्ती दिल्या. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश देशाला दिले. त्याच वास्तूमध्ये संविधान उद्देशिका पार्क उभे राहिल्याने या गौरवात वृध्दी झाल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. विद्यापिठाच्या ई-ग्रंथालयासाठी त्यांनी एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही केली.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या भाषणात संविधान उद्देशिका पार्कच्या उभारणीसाठी सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने करण्यात आलेल्या अर्थ सहाय्यासहीत अन्यबाबींचा परामर्श घेतला. तत्पूर्वी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला.
माजी विद्यार्थ्यांचा सत्कार
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधी व न्याय राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे वरिष्ठ न्यायमूर्ती अनिल किलोर, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी, न्या. भारती डांगरे, न्या. वाय. जी. खोब्रागडे, न्या. वृषाली जोशी, न्या. श्रीमती एम. एस. जावरकर, न्या. नितीन बोरकर, न्या. आर. एन लढ्ढा, न्या. ए.एन पानसरे आदींचा सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा संविधान उद्देशिका पार्क समितीचे अध्यक्ष गिरीष गांधी यांनी या वास्तूच्या निर्मितीतील विविध टप्प्यांची माहिती दिली. संविधान उद्देशिका पार्क समितीचे सदस्य पूरण मेश्राम यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉचे संचालक डॉ. रविशंकर मोर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment