गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात उलगडणार महाराष्ट्र घडविणाऱ्या
संत, हुतात्मे आणि लोकनेत्यांचा इतिहास
मुंबई, दि. 19 : महाराष्ट्र घडविणाऱ्या शिल्पकारांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. या चित्र प्रदर्शनातून समाजाला प्रेरणा देणाऱ्या वैभवशाली परंपरेचा गौरव करण्यात आला आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड् आशिष शेलार यांनी सांगितले..
महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या संत, महापुरुष, हुतात्मे आणि लोकनेत्यांचा इतिहास उलगडणाऱ्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात 21 मे पर्यंत करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, माजी खासदार आनंद परांजपे उपस्थित होते.
या चित्रप्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांपासून आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या मुख्यमंत्री व लोकनेत्यांपर्यंतच्या ऐतिहासिक वाटचालीचे दर्शन घडते. या प्रदर्शनात संत परंपरा, समाजसुधारणा चळवळी, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, तसेच विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा समावेश करण्यात आला आहे.
महोत्सवाच्या माध्यमातून वैभवशाली परंपरेचा गौरव
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, महाराष्ट्र घडविणाऱ्या शिल्पकारांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. या प्रदर्शनातून समाजाला प्रेरणा देणाऱ्या वैभवशाली परंपरेचा गौरव करण्यात आला आहे. राज्यातील जनतेला गौरवशाली महाराष्ट्राची माहिती मिळावी यासाठी हे चित्र प्रदर्शन जिल्ह्यात फिरत्या वाहनाद्वारे आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले त्यांनी सांगितले.
अनेक संत-महापुरुषांचे कार्य, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्मे, महाराष्ट्र स्थापनेनंतर राज्याच्या प्रगतीसाठी कार्यरत मुख्यमंत्र्यांचे कार्य भित्तीचित्रांच्या माध्यमातून उलगडण्यात आले आहे
स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे छत्रपती शिवाजी महाराज, सार्वजनिक सत्यधर्म स्थापणारे महात्मा फुले, सामाजिक समतेचा पाया रचणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज, संविधानाच्या माध्यमातून देशाला स्वातंत्र्य, समता, बंधूता ही मूल्ये देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अध्यात्माच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करणारे संत बसवेश्वर, संत सावता माळी, संत नामदेव, संत मुक्ताबाई, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा यांच्या कार्याची माहिती सांगणारी भित्तीचित्रे या प्रदर्शनात पहावयास मिळतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या ऐतिहासिक लढ्याला सलाम करणारे ‘गर्जा महाराष्ट्र’ या दालनाअंतर्गत क्रांतिसिंह नाना पाटील, प्रबेाधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, शाहीर शेख जैनू चांद यासह अनेक हुतात्मांच्या माहितीद्वारे संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा इतिहास उलगडला आहे. तसेच समाजसुधारक, तत्वचिंतक, गायक, लेखक, खेळाडू आणि उद्योजक अशा दिग्गजांची माहिती या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. राज्याचे आजी-माजी मुख्यमंत्री ज्यांनी राज्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले अशा सर्व मुख्यमंत्री आणि लोकनेत्यांची माहितीही या प्रदर्शनाद्वारे पहावयास मिळणार आहे.
000
No comments:
Post a Comment