विकसित कृषि संकल्प अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी कृषि क्षेत्रात कार्य करणारी देशाची सर्वोच्च संस्था भारतीय कृषि अनुसंधान परिषद परिश्रम घेत आहे. या अभियानामध्ये देशातील 723 जिल्ह्यांमधील 65 हजारपेक्षा जास्त गावांना भेट देणारी दोन हजार 170 तज्ज्ञ पथके सहभागी होणार आहेत. प्रत्येक पथकात किमान चार वैज्ञानिक असतील. या पथकांमध्ये कृषि विद्यापीठांचे वैज्ञानिक, संशोधन संस्थांचे तज्ज्ञ, शासकीय विभागांचे अधिकारी, नाविन्यपूर्ण कार्य करणारे शेतकरी आणि एफपीओचे कर्मचारी यांचा समावेश असेल. या अभियानाद्वारे देशातील 1.3 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्यात हे अभियान कृषि विभाग आणि 50 कृषि विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून 4 हजार 500 गावांत राबविले जाणार आहे. मराठवाडा विभागासाठी कुलगुरू प्रा.डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनखाली वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील आठ जिल्ह्यांतील 12 कृषि विज्ञान केंद्रे आणि सर्व विस्तार यंत्रणा सक्रिय सहभागी होणार आहेत. या उपक्रमासाठी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे आणि मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी विद्यापीठस्तरीय सूक्ष्म नियोजन केले आहे. यासाठी शास्त्रज्ञांचे चमू तयार केले असून याद्वारे प्रत्येक गावात 200 शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जवळपास दोन लाख 1 हजार 600 शेतकऱ्यांना खरीप पिकाचे अचूक नियोजन करण्यासाठी तंत्रज्ञान पोहचविण्यात येणार असून त्याद्वारे संपूर्ण परिसरात तंत्रज्ञान पोहोचले जाईल.
No comments:
Post a Comment