जागतिक वसुंधरा दिनानिमित्त 'पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा' उपक्रमात सहभागी व्हा
२२ एप्रिल, २०२५ ते १ मे, २०२५ या कालावधीत राज्यात विविध उपक्रम साजरे होणार
- पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मंत्री पंकजा मुंडे
आपल्या वसुंधरेसाठी नऊ दिवस समर्पित भावनेने काम करा
मुंबई, दि. 20 : पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी जागतिक वसुंधरा दिन दिनांक २२ एप्रिल, २०२५ ते महाराष्ट्र दिन १ मे, २०२५ या कालावधीत पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राज्यात 'पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा' (पर्यावरण बचाओ वसुंधरा सजाओ) हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.
'पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा' या उपक्रमांतर्गत मंत्री पंकजा मुंडे या स्वतः २२ एप्रिल रोजी मुंबईतील पवई तलाव येथे स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. या उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्रीमती मुंडे यांनी केले आहे.
नदी, नाले, तलाव स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे
श्रीमती मुंडे म्हणाल्या, 22 एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिवस आहे. या दिवशी आम्ही पर्यावरण वातावरणीय बदल विभागामार्फत एक अत्यंत चांगली संकल्पना राबवत आहोत. ती संकल्पना म्हणजे जागतिक वसुंधरा दिवसाच्या पासून म्हणजे, 22 एप्रिल ते 1 मे महाराष्ट्र दिनापर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जसं आपण नवरात्र साजरा करतो, नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा करतो, आराधना करतो, तसंच वसुंधरेची आराधना करण्यासाठी हे नऊ दिवस विविध कार्यक्रम आपण सर्वांनी राबवावेत. 22 एप्रिल रोजी या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. मी स्वतः 22 एप्रिल रोजी पवई लेक मुंबई येथून स्वच्छतेची सुरुवात करणार आहे. दि. 22, 23 आणि 24 एप्रिल रोजी आपण सर्वांनी आपापल्या भागातील, आपल्या गावातील, आपल्या तालुक्यातील, आपल्या जिल्ह्यातील, आपल्या महानगरातील, नगरातील पाण्याचे विविध स्त्रोत साफ करायचे आहेत. नद्या, नाले, तलाव ह्यांची स्वच्छता करायची आहे. ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकापासून ते जिल्हा परिषद सीईओपर्यंत, तलाठ्यापासून ते जिल्हाधिकारीपर्यंत, ग्रामपंचायतच्या सरपंच, सदस्यापासून ते जिल्हा परिषद अध्यक्षापर्यंत आणि आमदार, खासदार, पालकमंत्री या सर्वांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन श्रीमती मुंडे यांनी केले आहे.
याबरोबर शासकीय यंत्रणासमवेत वेगवेगळ्या संघटना, स्वयंसेवी संस्था यांनी देखील यामध्ये सहभाग घ्यावा. नदी - नाले, सरोवर स्वच्छ करणाऱ्या लोकप्रतिनिधीचे अधिकाऱ्याचे आणि सामाजिक संस्थेचे मूल्यमापन करून त्यांचा सुद्धा जिल्हा पातळीवर पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणानंतर सन्मान होईल आणि राज्यभरातून अशा अत्यंत चांगल्या काम केलेल्या लोकांचा राज्यपातळीवरही सन्मान होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment