महावीर जयंतीनिमित्त सर्वधर्मीय परिसंवाद संपन्न
शांती, सौहार्दाशिवाय विकसित राष्ट्राचे ध्येय गाठता येणार नाही
- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
अनेकांताचा आदर करा परंतु त्यामागील एकता शोधण्याचा प्रयत्न करा
- राज्यपाल आरिफ मोहम्मद खान
मुंबई, दि. ९ : समाजात शांती व सौहार्दयाचे वातावरण असल्याशिवाय विकसित राष्ट्राचे ध्येय गाठता येणार नाही असे सांगून सर्वधर्म संवादामुळे परस्परांविषयी असलेले पूर्वग्रह दूर होण्यास व समाजासमाजातील दुही मिटण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.
पु.ल. देशपांडे अकादमी, मुंबई येथे लोकमत माध्यम समूह आणि अहिंसा विश्व भारती यांच्या संयुक्त विद्यमाने महावीर जयंतीचे औचित्य साधून 'सर्व धर्मीय संवादाच्या माध्यमातून जागतिक शांतता व सौहार्द' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, सर्वशक्तिमान परमात्म्यासमोर सर्व धर्म सामान आहेत. त्यामुळे आपण सर्व धर्म व प्रार्थना पद्धतीचा आदर केला पाहिजे. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून राज्यातील संतांनी वेदांचे ज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवले आहे. भारताने अनादी काळापासून सर्व धर्मांचे स्वागत केले. भारतात चार धर्मांचा जन्म झाला व देशात पारशी, ज्यू, मुस्लिम यांपैकी कुणालाही धर्मावरून दुजाभावाची वागणूक दिली गेली नाही असे राज्यपालांनी सांगितले.
नव्या पिढींना बहुधर्मीय व बहू सांस्कृतिक समाजात राहावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना सर्व धर्मांचा व पंथांचा आदर करण्यास शिकवणे आवश्यक आहे. या दृष्टीने शाळा व महाविद्यालयांनी सर्व धर्मांचे सण साजरे केले पाहिजे तसेच विद्यार्थ्यांच्या विविध धर्मियांच्या प्रार्थना स्थळांच्या भेटींचे आयोजन केले पाहिजे, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सांगितले.
अनेकांतचा स्वीकार करा परंतु एकता शोधण्याचा प्रयत्न करा : राज्यपाल आरिफ मोहम्मद खान
जगातील विविधता नैसर्गिक आहे तशीच विचारा विचारातील मतभिन्नता स्वाभाविक आहे. या अनेकांताचा स्वीकार करा परंतु त्यासोबतच त्यामागील शाश्वत एकता शोधण्याचा प्रयत्न करा, असे प्रतिपादन बिहारचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांनी यावेळी बोलताना केले.
समाजातील सौहार्दासाठी तसेच मुक्ती साधण्यासाठी अनेकांताचा आदर केला पाहिजे. भारतीय वेद व इतर प्राचीन ग्रंथांना अपौरुषेय म्हणतात असे सांगून आपल्या देशात एखादा सिद्धांत विचार आपला आहे असा कुणीही दावा केला नाही. विचार आणि आचरण ही मनुष्याची खरी ओळख आहे.
सर्व जग एका परमात्म्याचे प्रकटीकरण आहे. त्यामुळे माझ्याच धर्माचे म्हणणे योग्य आहे असा अभिमान कुणीही बाळगू नये असे सांगून लोकांनी सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे असे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते सेलो ग्रुपचे संचालक प्रदीप राठोड, जिटोचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी, भारत जैन महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष चिमणलाल डांगी, उज्वल पगारिया, विशाल चोरडिया, नितीन खारा, प्रकाश धारिवाल, राजेश जैन यांना 'लोकमत पीस अँड हार्मनी' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
लोकमत समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक डॉ. आचार्य लोकेश, अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष डॉ. भदंत राहुल बोधी महाथेरो, माजी पोलीस महासंचालक डॉ. पी. एस. पसरीचा हे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment