विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार पात्रता,स्वरूप, अर्ज
मुंबई, दि. 22 : राज्य शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून दिले जाणारे कामगार भूषण व विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार 2023 कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी जाहीर केले.
कामगार भूषण पुरस्कारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील बजाज ऑटो लिमिटेडचे कामगार श्रीनिवास कोंडिबा कळमकर यांची निवड करण्यात आली आहे. कामगारांसाठी असलेल्या या सर्वोच्च पुरस्कारासाठी राज्यातून केवळ एका कामगाराची निवड केली जाते. विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी राज्यभरातून ५१ कामगारांची निवड करण्यात आली आहे. नोकरी करत असतानाच विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कामगारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. दरवर्षी एका कामगाराची कामगार भूषण पुरस्कारासाठी तर ५१ कामगारांची विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.
कामगार मंत्री अॅड.आकाश फुंडकर, कामगार राज्यमंत्री अॅड.आशिष जयस्वाल, कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी सर्व पुरस्कार्थींचे अभिनंदन केले आहे. हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी, मुंबई येथे येत्या १३ मे रोजी या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
2024 च्या पुरस्कारासाठी अर्ज
सन २०२४ मधील विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार आणि कामगार भूषण पुरस्कारासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया २८ एप्रिल २०२५ पासून सुरु करण्यात येत आहे. या पुरस्कारांचे अर्ज मंडळाच्या www.public.mlwb.in या संकेतस्थळावर तसेच राज्यातील विविध कामगार कल्याण केंद्रात उपलब्ध करून देण्यात येतील. हे अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २३ मे २०२५ आहे.
पुरस्काराचे स्वरुप -
कामगार भूषण पुरस्कारासाठी रु.५० हजार, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरवण्यात येते, तर गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी रु.२५ हजार, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र प्रदान करण्यात येते.
No comments:
Post a Comment