मित्रच्या नियामक मंडळाची दुसरी बैठक
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी नवीन साठवण तलाव बांधावेत
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 24 - कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने मोठ्या धरणाच्या पाणलोट (कॅचमेन्ट) क्षेत्राबाहेरील लघु पाटबंधारे प्रकल्पांचे खोलीकरण करण्याचे व नवीन साठवण तलाव बांधण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
महाराष्ट्र इन्स्टिटयूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन - 'मित्र' या संस्थेच्या नियामक मंडळाची दुसरी बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी नियामक मंडळाचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, आमदार राणा जगजीतसिंह, राजेश क्षीरसागर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार तथा 'मित्र'चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर होण्यासाठी आवश्यक धोरणे तयार करण्यासाठी उपाययोजना संदर्भात श्री. परदेशी यांनी यावेळी सादरीकरण केले. तसेच महास्ट्राईड प्रकल्प, महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास प्रकल्प आदींचा आढावा घेण्यात आला. केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाला सादर करावयाच्या प्राथमिक प्रकल्प अहवालच्या मानक कार्य प्रणालीला(एसओपी) यावेळी मान्यता देण्यात आली.
जागतिक बँक आणि बाह्य सहाय्यद्वारे राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या 'एसओपी'मध्ये दिलेल्या कालबद्ध कार्यक्रमाप्रमाणे सादरीकरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.
राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी दरवर्षी राज्याचे सकल उत्पन्न (जीडीपी) 14.5 टक्के करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात राज्य आधार सामग्री प्राधिकरण (स्टेट डेटा पॉलिसी) मधून साधन सामग्री तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या.
No comments:
Post a Comment