महाराष्ट्रातील 9 मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित
नवी दिल्ली, दि.28 : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’चे वितरण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्रातील 9 मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.
राष्ट्रपती भवनातील एका शानदार समारंभात पद्म पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनकड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तसेच अन्य केंद्रीय मंत्रीगण उपस्थित होते.
आज प्रथम टप्प्यात पार पडलेल्या पद्म पुरस्कार समारंभात राज्यातील 9 मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर, गझल गायक पंकज उधास (मरणोत्तर) यांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ तर अरुंधती भट्टाचार्य, पवनकुमार गोयंका व्यापार व उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी, जस्पिंदर नरुला, रानेद्र भानू मजुमदार, वासुदेव कामत यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी व चैत्राम पवार यांना पर्यावरण आणि वनसंवर्धन, सामाजिक क्षेत्र, मारोती चीतमपल्ली यांना वन्यजीव अभ्यासक, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दोन मान्यवरांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान
भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता शेखर कपूर यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. १९८३ मध्ये 'मासूम' चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या कपूर यांनी 'मिस्टर इंडिया', 'बँडिट क्वीन' आणि 'एलिझाबेथ' यांसारख्या चित्रपटांद्वारे आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली. 'एलिझाबेथ' चित्रपटाला सात ऑस्कर नामांकने मिळाली होती. शेखर कपूर यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीत भरीव योगदान दिले आहे.
प्रसिद्ध गजल गायक पंकज उधास यांना आज मरणोत्तर "पद्मभूषण" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पंकज उधास यांनी आपल्या सुरेल आवाजाने पाच दशके संगीतप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. 'चिट्ठी आई है.....', 'चांदी जैसा रंग है तेरा......', आणि 'न कजरे की धार......' ' अशा गजलांनी त्यांना जगभर प्रसिद्धी मिळवली. २००६ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. गजल गायकीतील योगदानासाठी त्यांना मरणोत्तर जाहीर झाला होता. हा पुरस्कार त्यांची पत्नी यांनी आज स्वीकारला.
No comments:
Post a Comment