महाबळेश्वर येथे 2 ते 4 मे 2025 रोजी
'महाराष्ट्र महापर्यटन उत्सव'चे आयोजन
- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई
महोत्सवात ६० पंचतारांकित टेंट्स, लेझर शो, विविध पर्यटन सहली,
सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
मुंबई, दि. २९ : महाबळेश्वर येथे २ ते ४ मे २०२५ रोजी 'महाराष्ट्र महापर्यटन उत्सव'चे आयोजन केले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने महाबळेश्वर येथे ६० पंचतारांकित टेंट्स असतील, त्यात राहण्याची वेगळी अनुभूती लोकांना मिळणार आहे. लेझर शो, विविध पर्यटन सहली, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी महाराष्ट्राच्या महसूली विभागातील महत्वाच्या पर्यटन स्थळाचे ‘ब्रॅण्डींग’ करण्यासाठी महापर्यटन उत्सव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.
मंत्रालयातील मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सुर्यवंशी, पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल उपस्थित होते.
पर्यटन मंत्री देसाई म्हणाले की, यावर्षी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) वतीने महाबळेश्वर येथे “महापर्यटन उत्सव : सोहळा महाराष्ट्राचा” या तीनदिवसीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 2 ते 4 मे यादरम्यान सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर गीरीस्थानी येथे हा उत्सव संपन्न होणार आहे.
'महाराष्ट्र महापर्यटन उत्सव'चे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन
'महाराष्ट्र महापर्यटन उत्सव'चे उद्घाटन 2 मे रोजी सायंकाळी 5 वाजता गोल्फ क्लब मैदान इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, यांच्यासह अनेक पर्यटनप्रेमी यावेळी उपस्थित राहतील. या उत्सवाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन भेट देणार असून त्यांच्या हस्ते शनिवार, 3 मे रोजी 'छत्रपती प्रतापसिंह वन उद्यानाच्या नुतनीकरण पश्चात लोकार्पण सोहळा' तसेच 'पेटिट लायब्रेरीच्या नुतनीकरण केलेल्या वास्तूचे' उदघाटन होणार आहे.
No comments:
Post a Comment