आयआयटीच्या धर्तीवर मुंबईत आता आयआयसीटी
फिल्म सिटीत जागा देणार, केंद्र सरकारकडून ४०० कोटी
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
‘वेव्हज २०२५’ शिखर परिषदेचे यजमानपद महाराष्ट्राला
नवी दिल्ली, १३ : देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी संस्थेच्या धर्तीवर इंडियन इंस्टियुट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) मुंबईच्या गोरेगावात उभारण्यात येईल व यासाठी केंद्र शासन ४०० कोटी रूपयांची आर्थिक मदत करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषद (World Audio-Visual & Entertainment summit-२०२५-‘ वेव्हज २०२५’ ) च्या पहिल्या सत्राचे आयोजन सुषमा स्वराज भवन येथे करण्यात आले. या सत्रात मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी ही माहिती दिली.
जागतिक स्तरावर होणा-या या पहिल्या परिषदेचे यजमान पद महाराष्ट्र राज्याला मिळाले असून, राज्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे आभार मानले. राज्याच्या आर्थिक राजधानीत १ ते ४ मे २०२५ दरम्यान मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे ही भव्य परिषद होणार आहे. शिखर परिषदेच्या पहिल्या सत्राचे आयोजन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने केले असून, या सत्रात विविध देशांच्या राजदूत आणि उच्चायुक्तांनी सहभाग घेतला.
या महत्त्वाच्या बैठकीत केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयावर आपले विचार मांडले. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय व महाराष्ट्र शासन दरम्यान ‘वेव्हज २०२५’ निमित्त सामंजस्य करार झाला.
या सत्राचे प्रास्ताविक केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजु यांनी केले तर आभार केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन यांनी केले. यावेळी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव एल.अन्बलगन उपस्थित होते.
No comments:
Post a Comment