सायन-कोळीवाडा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प
वेळेत पूर्ण न झाल्यास कठोर कारवाई
- खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. १२ : सायन कोळीवाडा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाची कामे कालबद्ध मर्यादेत पूर्ण करण्यासाठी विकासकांना अंतिम नोटीस देण्यात येईल. त्यानंतरही जर कामे पूर्ण झाली नाहीत, तर संबंधित विकासकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.
यासंदर्भात विधानसभा सदस्य कॅप्टन आर.सेल्वन, राम कदम, मुरजी पटेल, असलम शेख यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
खनिकर्म मंत्री श्री. देसाई म्हणाले की, सायन-कोळीवाडासह बृहन्मुंबई क्षेत्रातील ५१७ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांपैकी २३३ प्रकल्पाच्या विकासकाला काढून टाकले आहे. १७ झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये विकासकाची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. तसेच विकासकांसाठी अभय योजना लागू केली असून त्याअंतर्गत विकासकांना विशिष्ट अटींसह सवलती दिल्या आहेत.
तसेच उपमुख्यमंत्री कार्यालयात विशेष समन्वयक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामार्फत प्रकल्पांचा आढावा घेतला जातो. या माध्यमातून रखडलेल्या पुनर्वसन प्रकल्पांना गती देण्यासाठी जिथे सुधारणा आवश्यक आहेत, तिथे त्वरित सुधारणा केल्या जातील आणि प्रकल्पांना गती दिली जाईल, असेही श्री. देसाई यांनी विधानसभेत सांगितले.
No comments:
Post a Comment