राज्याचे भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र व राज्य वस्तुसंग्रहालय मुंबईत उभारणार
सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार
मुंबई, दि. १८ : राज्याचे भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र व राज्य वस्तुसंग्रहालय मुंबईत उभे करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.
सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी निवेदनात म्हटले की, महाराष्ट्राला वैभवशाली सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे, या वारशाचे जतन व संवर्धन करणे हे राज्य शासनाचे आद्य कर्तेव्य आहे. या अनुषंगाने राज्यस्तरीय एक भव्य "राज्य सांस्कृतिक केंद्र" व "राज्य वस्तुसंग्रहालय" राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी असणे अभिप्रेत आहे. राज्य सांस्कृतिक केंद्रामध्ये भव्य ऑडिटोरियम, कलादालने व रिसर्च सेंटर इत्यादी बाबी नियोजित आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी राज्य सांस्कृतिक केंद्र हा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रदर्शन देशी-विदेशी पर्यटकांसाठी आकर्षण असेल, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलाकारंसाठी एक व्यासपीठ म्हणून हे केंद्र कार्यरत असणार आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विविधतेची मांडणी एकाच छताखाली आणण्यासाठी राज्यस्तरीय सांस्कृतिक भवनाची आणि राज्य वस्तुसंग्रहालयाची राज्याच्या राजधानीत आवश्यकता आहे. त्यानुषंगाने, मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या वांद्रे- कुर्ला संकुलात अधिसूचीत क्षेत्रात समाविष्ट असलेला मौजे वांद्रे सर्वें नंबर ३८१ न.भु.क्र., ६२९ (पै) येथील १४,४१८ चौरस मीटर हा भूखंड महसूल विभागाकडून सांस्कृतिक कार्य विभागास विनामूल्य हस्तांतरीत करण्यात येईल व त्या ठिकाणी भव्य असे राज्य सांस्कृतिक केंद्र व राज्य वस्तुसंग्रहालय उभारण्यात येईल, अशी घोषणा मंत्री शेलार यांनी केली.
राज्य वस्तू संग्रहालयामार्फत प्राचीन भारतीय वारशाचे जतन करून पुढील पिढ्यांना ते दाखवण्याचे काम, विविध उत्खनने आणि शोध कार्यक्रमातून उजेडात आलेल्या कलाकृती, महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तू, शस्त्रे आणि विणकाम, कपडे आणि पोशाख, शिल्पे आणि कलावस्तू कलाकृती, शिलालेख, ताम्रपट, प्राचीन-मध्ययुगीन रचनात्मक अवशेष आणि थोर कलाकाराच्या दुर्मिळ चित्रकृती जतन करणे साध्य होईल, असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment