परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर
- उद्योग मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. २६ : विशाल व अतिविशाल प्रकल्पांना सामुहिक प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रिमंडळ उपससमितीची बैठक दर तीन महिन्याला घेण्यात येत आहे. यामध्ये उद्योगांच्या अडचणी आणि सुविधा संदर्भात तातडीने निर्णय घेण्यात येत आहेत असे सांगून महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत अग्रेसर राज्य आहे असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.
म.वि.स. नियम २९३ अन्वये मांडलेल्या प्रस्तावावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले.
उद्योग मंत्री श्री. सामंत म्हणाले, थ्रस्ट सेक्टर, उच्च तंत्रज्ञानावर आधारित अतिविशाल उद्योग घटकांना सामुहिक प्रोत्साहन योजना व अन्य क्षेत्रीय धोरणांव्यतिरिक्त विशेष प्रोत्साहन मध्ये सुधारणा करून राज्यात होणारी नवीन गुंतवणुक व रोजगारनिर्मिती विचारात घेता, धोरणांतर्गत पाच उत्पादन क्षेत्रातील प्रत्येक क्षेत्रातील २ व ३ प्रकल्पाची कमाल मर्यादा न ठेवता एकूण प्रकल्पाची मर्यादा १० प्रकल्पावरून २२ प्रकल्पाएवढी वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच दावोस येथे २०२५ मध्ये महाराष्ट्रासोबत सामंजस्य करार केलेल्या एकूण १७ प्रकल्पांना सामुहिक प्रोत्साहन योजनेबरोबरच थ्रस्ट सेक्टर व उच्च तंत्रज्ञानावर आधारित धोरणानुसार अतिरिक्त विशेष प्रोत्साहने मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आणि इतर २ प्रकल्पांना त्यांच्या गुंतवणुकीनुसार अतिविशाल प्रकल्पाला विशेष प्रोत्साहने मंजूर करण्यात आले आहे. या १९ प्रकल्पामधून रूपये ३.९२.०५६ कोटी एवढी नवीन गुंतवणुक राज्यात येत असून त्याद्वारे एकूण एक लाखापेक्षा अधिक प्रत्यक्ष रोजगारनिर्मिती व अंदाजे २ ते ३ लाख एवढी अप्रत्यक्ष रोजागरनिर्मिती होणार आहे. तसेच दावोस २०२५ मधील उद्योग विभागांशी संबंधित एकूण ५१ सामंजस्य करारांपैकी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीतील १७ प्रकल्पांव्यतिरिक्त उद्योग विभागामार्फत मागील दोन महिन्यांच्या कालावधीत एकूण ९ प्रकल्पांना देकारपत्रे देण्यात आले आहेत. अशाप्रकारे एकूण २६ प्रकल्पांसंदर्भात २ महिन्यांच्या आत कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून याद्वारे राज्यात आगामी कालावधीत ६ लक्ष कोटी गुंतवणूक व त्याद्वारे २ लक्ष प्रत्यक्ष व ३ लक्ष अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार आहे.यामुळे
राज्याच्या विकासाला चालना मिळेल आणि महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणुकीत अग्रेसर राहील असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment