Saturday, 1 March 2025

बंजारा समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य

 बंजारा समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य  

                                                                                  - लोकसभा अध्यक्ष ओम बिरला

नवी दिल्लीदि. 28 : बंजारा समाज हा संस्कृती आणि संस्कार जपणारा आहे. माझ्या मतदार संघात ह्या समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यांच्या प्रश्नांची मला जाण आहे. या समाजाच्या अडचणी दूर करण्याचा निश्चित प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले.

       डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सभागृहामध्ये संत सेवालाल चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने ‘बंजारा महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले. याअंतर्गत संत सेवालाल यांची 286 वी जयंती आणि रूप‍ सिंग महाराज जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

            लोकसभा अध्यक्ष श्री बिर्ला म्हणाले, संत सेवालाल यांनी मानवतेचा संदेश दिला. पर्यावरण संवर्धनाचे काम या समाजाने केले. गुरू-शिष्य पंरपरा टिकवून हा समाज पुढे जातो, असेही श्री.बिर्ला म्हणाले.

        राजस्थानमधील कोटा या मतदारसंघात बंजारा समाजाची संख्या मोठी असल्याचे सांगत श्री बिर्ला म्हणाले, बंजारा समाजाची बोलीभाषा, खानपान, वेशभुषा एक समान असूनही वेगवेगळया राज्यात वेगवेगळया वर्ग घटकात हा समाज मोडतो. त्याचा अभ्यास करून या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

            तरुण पिढीला शिक्षण घेऊन पुढे येण्याचे आवाहन करत श्री बिर्ला म्हणाले, महाराष्ट्र शासनाने बंजारा समाजाच्या लोक पंरपरेवर आधारीत संग्रहालय बनवून त्यांच्या पंरपरेला जोपासण्याचे आणि पुढीच्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे मोलाचे काम केले आहे.

बंजारा समाजाच्या बोलीभाषेचा समावेश 8 व्या अनुसूचीमध्ये करावा

                                                          : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

बंजारा समाजातील देशभरातील लोक एकच गोर बोलीभाषा बोलतात, या बोलीभाषेचा समावेश संविधानातील 8 व्या अनुसूचीमध्ये करावा, अशी मागणी राज्याचे मृद वजलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केली.

संत सेवालाल महाराज हे महान क्रांतीकारी, विज्ञानवादी, दूरदृष्टी असणारे संत होते. राज्य शासनाने बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध पावले उचलली आहेत. वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी या स्थळाचा जिर्णोउद्धार केला आहे. बंजारा समाजातील सर्वांची प्रगती एकसारखी व्हावी यासाठी त्यांना एका वर्ग घटकात सामील करण्यात यावे. राजधानी दिल्लीत बंजारा भवन उभारण्यासाठी जागा मिळावी व देशभरातील बंजारा समाजाच्या तीर्थस्थळांना विकसित करावे, अशीही मागणीही श्री. राठोड यांनी केली. 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi