Wednesday, 19 March 2025

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे औद्योगिक वसाहत स्थापन करणार

 नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे औद्योगिक वसाहत स्थापन करणार

- उद्योग मंत्री उदय सामंत

 

मुंबईदि. 19 : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे नवीन औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहादा येथे औद्योगिक वसाहत स्थापन करून या भागात औद्योगिक गुंतवणूक व उद्योग सुरू करण्यासाठी शासन सकारात्मक आहेअशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

नंदुरबार जिल्ह्यातील औद्योगीकरणा बाबत सदस्य राजेश पाडवी यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेत सदस्य योगेश सागर यांनी सहभाग घेतला.

मंत्री श्री. सामंत म्हणालेनंदुरबार जिल्ह्यात औद्योगीकरण वाढवून तेथील स्थलांतर कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शेजारच्या गुजरात राज्यातील सुरत येथील वस्त्र उद्योग नंदुरबार जिल्ह्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले वस्त्रोद्योगाचे प्रकल्प आले आहेत. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात औद्योगीकरण निश्चितच वाढणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना थेट औद्योगिक प्रशिक्षण केंद्राशी जोडून त्यांचा कौशल्य विकास करून प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. याचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ करणार आहे. राज्यात अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे.

गुजरात राज्यातील सुरतमधील उद्योग नंदूरबार जिल्ह्यात आणण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करण्यात येईल. या समितीच्या माध्यमातून उद्योग वाढीसाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच शहादा येथील औद्योगिक वसाहतीसाठी आवश्यकता असल्यास बैठकीचे आयोजन करण्यात येईलअसेही मंत्री सामंत यांनी सांगितले

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi