पोषण आहारातून विद्यार्थ्यांना त्रास झाल्याप्रकरणी पुन्हा चौकशी करणार
-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. 20 : अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातील मौजे आडगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पोषण आहारातून 31 विद्यार्थ्यांना त्रास झाल्याप्रकरणी पुन्हा चौकशी करण्यात येईल. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत सांगितले.
याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत पुन्हा चौकशी करण्याचे निर्देश सभापती प्रा.राम शिंदे यांनी दिले. त्यावर मंत्री श्री.दादाजी भुसे यांनी पुन्हा चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. सदस्य परिणय फुके यांनी यासंदर्भातील मूळ प्रश्न उपस्थित केला होता.
याबाबत माहिती देताना शालेय शिक्षण मंत्री श्री.भुसे म्हणाले, आडगाव येथे विद्यार्थ्यांना पोषण आहारातून झालेल्या त्रासाची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. कांदा-लसूणच्या पेस्टची मुदत संपलेली होती, नवीन साहित्य आलेले असतानाही मुदत संपलेली पेस्ट वापरण्यात आली. यामुळे संबंधित शाळेतील स्वयंपाकी तथा मदतनीस यांना कामावरुन कमी करण्यात आले आहे. संबंधित मुख्याध्यापक यांना निलंबित करुन विभागीय चौकशीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच पुरवठादाराला एक लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.
यासंदर्भात राज्यातील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेसंदर्भात आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येत असल्याचेही श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment