राज्यात इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या 980 आश्रमशाळा
- इमाव व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे
मुंबई, दि. 25 : राज्यात इतर मागास व बहुजन कल्याण विभागांतर्गत 980 विजाभज खासगी अनुदानित निवासी आश्रमशाळा सुरू आहे. यामध्ये 530 प्राथमिक शाळा, 302 माध्यमिक आणि 148 उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहे, अशी माहिती इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबत सदस्य बबनराव लोणीकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य नारायण कुचे यांनी सहभाग घेतला.
या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना मंत्री सावे म्हणाले, प्राथमिक निवासी आश्रम शाळांपैकी 59 प्राथमिक आश्रम शाळांना 19 जुलै 2019 रोजी बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार इयत्ता 8 वी चा वर्ग मंजूर केला आहे. या भागात अन्य कुठलीही शाळा नसल्याने वित्त विभागातील नियमांच्या अधीन राहून ही मान्यता देण्यात आली. विभागाने 29 ऑक्टोबर 2020 नुसार प्राथमिक आश्रम शाळांनी नैसर्गिक वाढीने वर्गवाढ मिळण्याबाबत केलेल्या मागणीनुसार पायाभूत सोयी सुविधांची पूर्तता करणाऱ्या 96 प्राथमिक आश्रम शाळांना इयत्ता 8 वी वर्ग, 61 आश्रम शाळांना इयत्ता नववी वर्ग व त्यापुढील वर्षात त्यातील 31 आश्रम शाळा इयत्ता दहावीचे वर्ग वित्त विभागाच्या मान्यतेच्या आधीन राहून स्वखर्चाने चालवण्याच्या अटीवर नैसर्गिक वाढीने मंजूर केले आहे.
आश्रम शाळातील निवासी विद्यार्थ्यांचे परिपोषण तसेच वेतनेतर अनुदानासाठी सन 2024 - 25 मध्ये 250 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी 160 कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला असून 90 कोटींच्या निधीचेही वितरण आश्रमशाळांना होणार आहे, असेही इमाव व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment