अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीसाठी
स्वित्झर्लंडच्या उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागत
- राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल
मुंबई, दि. 11 : महाराष्ट्र हे देशातील मोठ्या प्रमाणावरील कृषी माल उत्पादक राज्य आहे. येथे अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रासह विविध क्षेत्रात गुंतवणुकीस मोठी संधी असून स्वित्झर्लंड सोबत परस्पर व्यापार वाढविण्यास महाराष्ट्र उत्सुक आहे. स्वित्झर्लंडच्या उद्योजकांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावे, महाराष्ट्र त्यांचे स्वागत करेल, असे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
स्वित्झर्लंडचे महावाणिज्य दूत आणि कौन्सुलेट कॉर्प्स चे डीन मार्टिन मेअर यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्राचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
मंत्री श्री. रावल यांनी महाराष्ट्रातील विविधतेबाबत श्री.मेअर यांना माहिती दिली. राज्यात हापूस आंबा, सह्याद्रीच्या रांगांमधील चवदार तांदूळ, मिलेट्स, ताजी फळे, भाजीपाला मुबलक प्रमाणात आहे. येथे अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात मोठी संधी आहे. राज्यात नुकतीच सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली आहे. गाईंचे पालन ही दोन्ही देशांमधील साम्य असलेली बाब असून स्वित्झर्लंड सोयाबीनची खरेदी करण्यास इच्छुक असल्यास महाराष्ट्रातून निर्यात करता येईल, असे त्यांनी सांगितले.
राज्यात विविध प्रकारची पर्यटनस्थळे असून स्वित्झर्लंडमधील पर्यटकांनी येथे भेट द्यावी, असे आवाहन मंत्री श्री.रावल यांनी श्री.मेअर यांच्याकडे केले. यासाठी विविध देशांच्या महावाणिज्य दूतांना येथील पर्यटन स्थळांची ओळख करुन देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
श्री.मेअर यांनी स्वित्झर्लंडच्या महावाणिज्य दूतावासाच्या कार्यपद्धतीबाबत माहिती देऊन आमचा वर्षभर चालणाऱ्या पर्यटनवाढीवर भर असल्याचे सांगितले. महाराष्ट्र हे उद्योग आणि व्यापाराच्या दृष्टीने सर्वाधिक चांगले राज्य असल्याची प्रशंसा त्यांनी केली
No comments:
Post a Comment