छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 'जय शिवाजी, जय भारत' पदयात्रेचे आयोजन
छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार जीवनामध्ये स्वीकारण्याचा संकल्प युवकांनी करावा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विकसित भारताचा संकल्प घेण्यासाठी 'जय शिवाजी, जय भारत' पदयात्रा
- केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया
पुणे, दि. 19: छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला विचार, अठरापगड जातींना सोबत घेऊन सामान्य माणसाच्या कल्याणाकरिता, महिलांच्या कल्याणाचा, सन्मानाचा विचार आपण देखील आपल्या जीवनामध्ये स्वीकारणार आहोत हा संकल्प युवकांनी करावा. यासाठी 'जय शिवाजी, जय भारत' पदयात्रा उपक्रम उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाच्यावतीने आयोजित 'जय शिवाजी, जय भारत' पदयात्रेचा शुभारंभ कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग पुणेच्या वसतिगृह मैदानापासून झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ज्यावेळी भारतात अनाचार, अंध:कार होता आणि भारतातील अनेक राजे रजवाडे मुघलांचे मांडलिकत्व पत्करायला उत्सुक होते. मुघलांच्या अधिपत्याखाली काम करत होते. अशावेळी मा जिजाऊंच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या सामान्य मावळ्यांना एकत्र करून त्यांना रयतेचे राज्य तयार करण्यासाठी लढाई करण्याची प्रेरणा दिली. त्यानुसार मावळ्यांनी चमत्कार करून दाखवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. महाराजांनी आपला आत्माभिमान जागृत करून असा अंगार फुलविला की त्यानंतर मराठ्यांनी अटकेपार थेट अफगाणिस्तान पर्यंत झेंडे रोवले. संपूर्ण भारतभर स्वराज्य स्थापन करून भारताला स्वराज्याची देण दिली.
ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक लढवय्ये नव्हते तर उत्तम राज्यकर्ते होते. शेतकऱ्यांचे कल्याण, जलसंवर्धन, जंगलांचे संवर्धन, उत्तम स्थापत्यशास्त्राचे नमुने असलेले गड किल्ल्यांचे निर्माण, आरमाराचे निर्माण आदींच्या माध्यमातून अभेद्य तटबंदी, सागरी सुरक्षा आदी बाबी छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकविल्या. त्यामुळेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात व्हावा म्हणून नामांकन केले असून लवकरच त्यांचा जागतिक वारसा स्थळात समावेश होईल.
No comments:
Post a Comment