कर्करोग प्रतिबंधासाठी जनजागृती गरजेची
मुंबई, दि.4 : कर्करोगापासून बचाव करण्यासाठी राज्यात जनजागृती आवश्यकता असून वैद्यकीय क्षेत्रातील सर्व तज्ज्ञ याकामी सेवाभावाने काम करत आहेत. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून हे काम अधिक चांगल्या पद्धतीने, अधिक गतीने आणि एकजुटीने करावे. कर्करोगावर मात करण्यासाठी योग्य औषध उपचारांबरोबर अत्याधुनिक आरोग्य केंद्राच्या उभारणीवर भर द्यावा लागणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज व्यक्त केली.
जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह, आरोग्य सेवा तथा अभियान संचालनालयानाचे आयुक्त अमगोथू श्री रंगा नायक, आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, टाटा मेमोरियल इस्टिट्यूटचे संचालक डॉ.सुदिप गुप्ता, कॅन्सर वॉरियर, आरोग्यसेविका, आशासेविका तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील डॉक्टर्स आदी उपस्थित होते.
सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री.आबिटकर म्हणाले की, कर्करोगाची रूग्णसंख्या वाढत असून मुंबईतील टाटा हॉस्पिटलच नाही तर प्रत्येक शहरांमध्ये सुद्धा हॉस्पिटलची आवश्यकता निर्माण झाली आहे. आरोग्य विभागाच्या यंत्रणेनेही यासाठी सजगतेने काम करणे गरजेचे आहे. आज चांगला आहार, जीवनशैली यामुळे आयुर्मान वाढले आहे. परंतु शेतीशी, शारीरिक श्रमाशी ज्यांची नाळ तुटली, ती माणसं मात्र साठीतच अनेक व्याधीने ग्रस्त झाली आहेत. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेने सूर्यनमस्कार, योगासने यांच्या प्रशिक्षणाबरोबरच कर्करोग होऊ नये यासाठी प्रबोधनाची मोहीम राबविण्याची गरज आहे. कर्करोग मुक्तीच्या अभियानांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर येण्यासाठी सगळ्यांनी हातात हात घालून काम करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी केले.
No comments:
Post a Comment