मच्छिमार संस्थांना समन्यायी पद्धतीने
तलावांच्या वाटपाचे धोरण राबवा
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. 25 : राज्यातील सर्व मच्छिमार संस्थांना समन्यायी पद्धतीने तलावांचे वाटप होण्याच्या दृष्टीने आणि तलावांचे वाटप होताना संस्थांच्या सभासद संख्येनुसार तलाव क्षेत्र ठरवणारे धोरण तयार करावे अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.
मंत्रालयात भूजलाशयीन मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांच्या अडचणीबाबत बैठक झाली. त्यावेळी मंत्री श्री. बावनकुळे बोलत होते. बैठकीस मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, मत्स्यव्यवसाय सचिव डॉ. एन रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, मत्स्यव्यवसाय उद्योग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिता मेश्राम यांच्यासह मच्छिमार संस्थांचे प्रतिनिधी आणि विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
तलावांचे वाटप करताना 1 ते 25 सभासद संख्या असलेल्या संस्थेस 50 हेक्टर क्षेत्रापर्यंतचे तलाव देण्यात यावेत असे सांगून मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, त्यापुढील सभासद संख्येनुसार तलावाचे क्षेत्र वाढवत न्यावे. या वाटपाची एक साचेबद्ध रचना करून त्याची तबाबदारी संबंधित क्षेत्र अधिकारी यांच्याकडे सोपवावी. मत्स्यव्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने तसेच व्यवसायामध्ये गुणवत्ता निर्माण करण्यासाठी पीएमसी नेमाव्यात. राज्यातील 6 महसुली विभागांसाठी 6 पीएमसी नेमाव्यात. त्यामुळे मत्स्योत्पादनात चांगली वाढ होईल. विभागाने मच्छिमार संस्थांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे. तसेच उच्च दर्जाचे मत्स्यबीज उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करावे. चांगले मत्स्यबीज उपलब्धतेसाठी निधीची तरतूद करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
राज्यातील सर्व तलावांचे नियंत्रण मत्स्यव्यवसाय विभागाकडे असावे असे सांगून मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, यासाठीचा प्रस्ताव तयार करावा. तसेच जिल्हा नियोजनच्या निधीतून किमान 10 टक्के निधी मत्स्यव्यवसायासाठी राखीव ठेवाण्यासाठीचा प्रस्ताव तयार करावा. हे दोन्ही प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवावेत. मत्स्यव्यवसायाला कृषी उद्योगाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसायासाठी सर्वसमावेशक योजना तयार कराव्यात, अशा सूचनाही मंत्री श्री. बावनकुळे यांनी दिल्या.
No comments:
Post a Comment